IND vs SA 2nd Test Live Match Updates In Marathi | केपटाउन: सलामीच्या सामन्यातील लाजिरवाण्या कामगिरीनंतर भारतीय संघाने दुसऱ्या सामन्याची सुरूवात जोरदार केली. मोहम्मद सिराजने यजमानांचा चांगलाच समाचार घेतला अन् सहा बळी पटकावले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेला आपल्या पहिल्या डावात अवघ्या ५५ धावा करता आल्या. भारतीय गोलंदाजांनी पहिल्याच दिवशी चमक दाखवली. दुसऱ्या सामन्यासाठी कर्णधार रोहित शर्माने मुकेश कुमार आणि रवींद्र जडेजा यांना संधी दिली आहे. पण, सिराजचे वादळ आले अन् आफ्रिकन फलंदाजीची कंबर मोडली.
मोहम्मद सिराजने दुसऱ्या कसोटीचे पहिले सत्र गाजवले. त्याने पहिल्या स्पेलमध्ये ९-३-१५-६ अशी अप्रतिम गोलंदाजी करून दक्षिण आफ्रिकेला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. त्याला जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांची मिळालेली साथ लक्षणीय होती. भारताविरुद्धची कोणत्याही संघाची कसोटीतील ही सर्वात निचांक कामगिरी ठरली. मोहम्मद सिराजने सर्वाधिक नऊ षटके टाकली आणि सर्वाधिक सहा बळी घेतले. तर जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांना प्रत्येकी २-२ बळी घेण्यात यश आले.
दरम्यान, क्षेत्ररक्षणादरम्यान यष्टीच्या बाजूला उभा असलेला विराट कोहली मोहम्मद सिराजला रणनीती सांगताना दिसला. विराटने सांगितल्याप्रमाणे सिराजने चेंडू टाकला आणि भारताला फायदा झाला. कारण विराटने इशारा करताच सिराजला बळी घेण्यात यश आले. दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात २३.२ षटकात सर्वबाद केवळ ५५ धावा करू शकला.
विराटचा इशारा अन् सिराजचा करिश्मा
दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल,
विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि मुकेश कुमार.
दुसऱ्या कसोटीसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ -
डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्करम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को जान्सेन, केशव महाराज, कगिसो रबाडा, नांद्रे बर्गर आणि लुंगी एनगिडी.