IND vs SA 2nd Test Jasprit Bumrah Remove Aiden Markram : गुवाहाटी कसोटी सामन्यातील दुसऱ्या सामन्यातील पहिल्या दिवसाच्या खेळात जसप्रीत बुमराहनं कमालीची गोलंदाजी केली. जी विकेट डावाच्या सातव्या षटकात मिळायला हवी होती त्यासाठी जसप्रीत बुमराहला सातव्या षटकापर्यंत प्रतिक्षा करावी लागली. KL राहुलनं दक्षिण आफ्रिकेच्या डावातील सातव्या षटकात मार्करमचा सोपा झेल सोडला. त्यानंतर 'आत्मनिर्भर' बुमराह शो पाहायला मिळाला. जसप्रीत बुमराहनं चहापानाआधी आपल्या वैयक्तिकत सातव्या आणि दक्षिण आफ्रिकेच्या डावातील २७ व्या षटकात एडन मार्करमला क्लीन बोल्ड करत संघाला मोठा दिलासा दिला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मार्करम बोल्ड! बुमराहनं KL राहुलसोबत केलं विकेटचं सेलिब्रेशन
केएल राहुलनं मार्करमचा झेल सोडला त्यावेळी तो ४ धावांवर खेळत होता. त्यानंतर सेट होत त्याने संघाच्या धावसंख्येत ३४ धावांची भर घातली. रायन रिकल्टनच्या साथीनं त्याने पहिल्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी रचली. पहिल्या सत्राच्या खेळात दक्षिण आफ्रिका संघ बाजी मारतोय, असे चित्र निर्माण झाले असताना जसप्रीत बुमराहनं अप्रतिम चेंडूवर दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का दिला. ३८ धावांवर त्याने मार्करमचा खेळ खल्लास केला. ही विकेट घेतल्यावर जसप्रीत बुमराहनं पहिल्या संधी दवडलेल्या केएल राहुलला मिठी मारत या विकेटचा आनंद साजरा केल्याचे पाहायला मिळाले. हा क्षण एकदम खास आणि टीम इंडियासोबत केएल राहुलला मोठा दिलासा देणारा असाच होता.
IND vs SA : बुमराहनं मार्करमसाठी जाळं विणलं; पण KL राहुलनं स्लिपमध्ये झोपा काढत त्यावर पाणी फेरलं!
चहापानानंतर दुसरा सलामीवीरही तंबूत
क्रिकेटच्या मैदानात एक विकेट आली की, त्यापाठोपाठ दुसरी विकेटही मिळण्याचा एक मार्गही खुला होता. गुवाहाटीच्या मैदानात तेच चित्र पाहायला मिळाले. जसप्रीत बुमराहनं भारतीय संघाला पहिली विकेट मिळवून दिल्यावर कुलदीप यादव पिक्चरमध्ये आला. ८२ धावांवरच कुलदीप यादवनं रायन रिकल्टनच्या रुपात दुसरा धक्का दिला. विकेट मागे पंतनं उत्तम झेल टिपला. रायन रिकल्टन याने ८२ चेंडूचा सामना करून ३५ धावा केल्या.