IND vs SA 2nd Test Day 4 Stumps : गुवाहाटी कसोटी सामन्यात भारतीय संघ पराभवाच्या छायेत दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दिलेल्या ५४९ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने दुसऱ्या डावात दोन्ही सलामीवीराच्या विकेट्स स्वस्तात गमावल्या. यशस्वी जैस्वाल १३ धावा करून पुन्हा एकदा मार्को यान्सेनचा शिकार झाला. त्याच्यापाठोपाठ सायमन हार्मर याने अप्रतिम ऑफ स्पिनवर लोकेश राहुलला अवघ्या ६ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
...अन् टीम इंडियावर आली कुलदीप यादवला 'नाईट वॉचमन'च्या रुपात चौथ्या क्रमांकावर धाडण्याची वेळ
डोंगराऐवढ्या धावसंख्येचा पाठलाग करताना दोन्ही सलामीवीरांनी नांगी टाकल्यानंतर भारतीय संघावर कुलदीप यादवला नाईट वॉचमनच्या रुपात चौथ्या क्रमांकावर पाठवण्याची वेळ आली. चौथ्या दिवसाअखेर भारतीय संघाने २ विकेट्सच्या मोबदल्यात २७ धावा केल्या असून साई सुदर्शन २५ चेंडूचा सामना करून २ धावांवर खेळत होता. दुसऱ्या बाजूला कुलदीप यादवनं २२ चेंडूचा सामना करताना एका चौकाराच्या मदतीने ४ धावा काढल्या होत्या. भारतीय संघ अजूनही ५२२ धावांनी पिछाडीवर असून पाचव्या आणि अखेरच्या दिवशी सामना वाचवण्यासाठी टीम इंडियाला कसरत करावी लागणार आहे. दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिकेचा संघ ८ विकेट्स घेऊन २५ वर्षांनी टीम इंडियाला क्लीन स्वीप करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
IND vs SA : कोहलीनं २० वर्षांनी घेतला होता तेंडुलकरच्या कॅप्टन्सीतील 'क्लीन स्वीप'चा बदला, पण आता...
शतकासाठी डाव घोषित करण्यात विलंब, पण...
चौथ्या दिवसाच्या खेळात ५०० पेक्षा अधिक धावांची आघाडी घेतल्यावरही ट्रिस्टन स्टब्सच्या शतकासाठी टेम्बा बावुमानं डाव घोषित करण्यासाठी वेळ घेतला. स्टब्स ९४ धावांवर बाद होताच त्याने ५ बाद २६० धावांवर डाव घोषित केला. हा विलंब दक्षिण आफ्रिकेच्या विजयाची आस धूसर करणारा ठरेल, असे वाटत होते. पण भारतीय सलामीवीरांच्या फ्लॉप शोमुळे असं काही घडण्याऐवजी टीम इंडियावर घरच्या मैदानात 'क्लीन स्वीप' होण्याची वेळ येणार असे चित्र निर्माण झाले आहे. मालिकेसह ट्रॉफी गेली आता टीम इंडियासाठी पाचवा आणि अखेरचा दिवस हा सामना अनिर्णित राखून लाज राखण्याची कसोटी ठरेल.
कोण उचलणार पराभव टाळण्याची जबाबदारी
नाईट वॉचमनच्या रुपात चौथ्या क्रमांकावर आलेल्या कुलदीप यादवनं पहिल्या डावात १३४ चेंडूचा सामना करून १९ धावांची खेळी करताना आपल्यातील बचावात्मक खेळी करण्याची क्षमता दाखवली होती. पाचव्या आणि अखेर्या दिवशी त्याच्याकडून पुन्हा एकदा बॅटिंगमधील चिवट कामिगरीची अपेक्षा असेल. साई सुदर्शनला पहिल्या डावातील अपयश भरून काढण्यासाठी मैदानात तग धरून आपल्यातील क्षमता सिद्ध करावी लागेल. ही जोडी किती काळ टिकणार? वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा आणि पंत यापैकी पराभव टाळण्याची जबाबदारी कोण घेणार? ते पाहण्याजोगे असेल. दक्षिण आफ्रिकेला मार्कोशिवाय सायमन हार्मनकडून सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा असेल. ही जोडी टीम इंडियाासाठी डोकेदुखी ठरली आहे.