IND vs SA 2nd Test Day 3 Stumps : गुवाहाटी कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाच्या खेळात पाहुण्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारतीय संघाला पहिल्या डावात २०१ धावांत आटोपले. पहिल्या डावातील ४८९ धावांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं २८८ धावांची मोठी आघाडी घेतली. घरच्या मैदानात भारतीय संघासमोर प्रतिस्पर्धी संघाने संघाने घेतलेली दुसऱ्या क्रमांकाची मोठी आघाडी ठरली. याआधी २०१७ मध्ये बांगलादेशच्या संघाने भारताविरुद्ध २९९ धावांची आघाडी घेतली होती.
तिसऱ्या दिवसाअखेर दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडे ३१४ धावांची भक्कम आघाडी
मोठ्या धावसंख्येच्या आघाडीसह सामन्यात मजबूत स्थितीत असतानाही टेम्बा बावुमानं टीम इंडियााल फॉलोऑन न देता पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या दिवसाअखेर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दुसऱ्या डावात ८ षटकांच्या खेळात बिन बाद २६ धावा करत ३१४ धावांची आघाडी घेतली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी रायन रिकल्टन २५ चेंडूत नाबाद १३ धावा तर एडन मार्करम २३ चेंडूत १२ धावांवर खेळत होता. इथं जाणून घेऊयात तिसऱ्या दिवसाच्या खेळात नेमकं काय घडलं? दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार टेम्बा बावुमान टीम इंडियाला फॉलोऑन न देण्यामागची काय असू शकतात प्रमुख कारण त्यासंदर्भातील सविस्तर माहिती
टीम इंडियाकडून एकमेव अर्धशतक; पाहुण्या संघाकडून मार्कोसह हार्मरचा जलवा!
लोकेश राहुल आणि यशस्वी जैस्वाल या जोडीनं बिन बाद ९ धावांवरून तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. तासाभराच्या खेळात दोघांनी ६५ धावांची भागीदारी रचली. पण ही जोडी फुटली अन् ठराविक अंतराने टीम इंडियाने विकेट गमावल्या. यशस्वी जैस्वालनं केलेल्या ९७ चेंडूतील ५८ धावा आणि तळाच्या फलंदाजीत वॉशिंग्टन सुंदरनं ९२ चेंडूत केलेल्या ४८ धावांच्या खेळीशिवाय अन्य कुणालाही मैदानात तग धरता आला नाही. या दोघांशिवाय लोकेश ऱाहुल २२ (६३), साई सुदर्शन १५ (४०), नितीश कुमार रेड्डी १० (१८) आणि कुलदीप यादव १९ (१३४) यांनी दुहेरी आकडा गाठला. पण ही खेळी बहरण्यात त्यांना अपयश आले. दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील जलदगती गोलंदाज मार्को यान्सेनच्या उसळत्या चेंडूवर भारतीय फलंदाजी गडबडली. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या. याशिवाय सायमन हार्मर याने ३ तर केशव महाराज याने एक विकेट आपल्या खात्यात जमा केली.
बावुमानं टीम इंडियाला फॉलोऑन देणं का टाळलं?
भारतीय संघाला फॉलोऑन टाळण्यासाठी किमान २९० धावा करायच्या होत्या. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारतीय संघाचा डाव २०१ धावांत आटोपला. पण तरीही टेम्बा बावुमानं संघाला फॉलोऑन दिला नाही. यामागचं पहिलं अन् प्रमुख कारण असू शकते ते म्हणजे दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी दिवसभर गोलंदाजी केली होती.
- भारतीय फलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या दमलेल्या गोलंदाजांवर भारी पडू नयेत, हा विचार कर्णधार आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघ व्यवस्थापनाने केला असावा.
- एवढेच नाही तर भारतीय संघाने आघाडी भेदून टार्गेट सेट केले तर चौथ्या डावात फलंदाजीची वेळ दक्षिण आफ्रिकेच्या संघावर आली असती. चौथ्या डावात धावांचा पाठलाग करणं आव्हानात्मक ठरू शकते, या गोष्टीचाही विचार केला गेला असेल.
- जर तरच्या भानगडीत अडकण्यापेक्षा दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पुन्हा बॅटिंग करून तगडे आव्हान उभे करण्याचा डाव खेळला आहे. चौथ्या दिवशी दोन सत्र जरी बॅटिंग केली तरी भारतीय संघासाठी हा सामना जिंकणं मुश्किल होईल. सामना अनिर्णित राहिला तरी दक्षिण आफ्रिका मालिका खिशात घालेल.