Karun Nair vs Team India Batting, IND vs SA 1st Test : कोलकाता कसोटी भारतीय संघासाठी अतिशय विचित्र ठरली. सहा वर्षांनी कोलकाताच्या मैदानावर कसोटी सामना खेळणाऱ्या भारताला मालिकेतील पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून ३० धावांनी पराभव पत्करावा लागला. कसोची विश्वविजेत्या दक्षिण आफ्रिकेने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतासमोर अवघे १२४ धावांचे लक्ष्य ठेवले होते, परंतु भारतीय फलंदाजीला ते आव्हानही पेलवले नाही. टीम इंडियाचा खेळ केवळ ९३ धावांवर आटोपला. या कामगिरीनंतर संघाच्या फलंदाजीवर जोरदार टीका झाली. पण याचदरम्यान, संघातून वगळण्यात आलेला अनुभवी फलंदाज करुण नायर याने एक वेगळीच करामत केली. एकीकडे भारतीय पिचवर टीम इंडिया ढेपाळली तर दुसरीकडे भारतीय पिचवरच करुण नायरने एकट्याने अख्ख्या टीम इंडियापेक्षाही जास्त धावा काढल्या आणि निवडकर्त्यांना काहीही न प्रत्युत्तर दिले.
भारतीय फलंदाजांची हाराकिरी
रविवारी ईडन गार्डन्स येथे झालेल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी आफ्रिकेचा दुसरा डाव सुरू झाला. कर्णधार टेम्बा बवुमाने झुंजार अर्धशतक झळकावले, पण संघाला १५३ धावाच करता आल्या. संपूर्ण सामन्यात अर्धशतक झळकावणारा बवुमा हा एकमेव फलंदाज होता. भारतीय संघाने पहिल्या डावात घेतलेल्या आघाडीमुळे अखेर १२४ धावांचे लक्ष्य टीम इंडियापुढे ठेवण्यात आले. कर्णधार शुभमन गिल दुखापतीमुळे संघाबाहेर झाला. त्याने फलंदाजी केली नाही. त्याच्याशिवाय इतर ९ खेळाडूंनी मिळून भारतासाठी केवळ ९३ धावाच केल्या आणि भारताला ३० धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.
करुण नायरची दमदार खेळी
टीम इंडियाच्या फलंदाजांवर एकीकडे टीका होत असतानाच, दुसरीकडे रविवारीच रणजी ट्रॉफीचे विविध सामने खेळवले जात होते. आफ्रिका मालिकेसाठी आणि त्यामागील वेस्ट इंडिज कसोटी मालिकेसाठी निवड न झालेला करुण नायर रणजी सामन्यात खेळत होता. तिकडे आफ्रिकन गोलंदाजीपुढे टीम इंडियाचे फलंदाज एकामागून एक विकेट गमावत असताना, करूण नायर रणजी सामन्यात चंदीगडमध्ये आपल्या फलंदाजीचे कौशल्य दाखवत होता. भारताच्या संपूर्ण संघाला केवळ ९३ धावा करता आल्या. तर दुसरीकडे करुण नायरने एकट्याने ९५ धावांची खेळी केली.
इंग्लंड दौऱ्यानंतर करुण नायरला संघातून वगळले
करुण नायर हा भारतीय पिचवर दमदार खेळी करतो याची साऱ्यांनाच कल्पना आहे. असे असताना त्याला इंग्लंडविरूद्ध तेथील पिचवर खेळवण्यात आले. तेथील मालिकेत पराभूत झाल्यानंतर, पुढे वेस्ट इंडिज आणि आफ्रिका दोघांविरोधात भारतीय पिचवर कसोटी मालिका सुरू होत्या. पण इंग्लंडविरूद्धच्या मालिकेतील कामगिरीचे कारण देत त्याला भारतीय संघातून वगळण्यात आले. असे असताना, भारतीय संघाने आफ्रिकेपुढे गुडघे टेकले. त्याच दिवशी करुण नायरने केलेली ९५ धावांची खेळी खूपच खास ठरली.