IND vs SA 1st Test Day 1 Jasprit Bumrah Takes Five Wicket South Africa 159 All Out : कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहनं दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ गारद केला. पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण भारतीय गोलंदाजांनी खास करुन बुमराहनं त्याचा हा निर्णय फोल ठरवला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बुमराहचा 'पंजा'; दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १५९ धावांत आटोपला
बुमराहचा भेदक माऱ्यासह सिराज आणि कुलदीपच्या सर्वोत्तम गोलंदाजीसमोर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या १५९ आटोपला. सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी केलेल्या अर्धशतकी भागीदारीनंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघातील एकाही फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही. भारताकडून जसप्रीत बुमराहनं घेतलेल्या ५ विकेट्सशिवाय मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २-२ तर अक्षर पटेलनं एक विकेट घेतली.
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
एक अर्धशतकी भागीदारी, पण फलंदाजीत सारेच अपयशी
नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना मार्करम आणि रिकल्टन जोडीनं संघाला चांगली सुरुवात करून दिली. २००८ नंतर पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेच्या सलामी जोडीनं टीम इंडियाविरुद्ध अर्धशतकी भागीदारी रचली. पण जसप्रीत बुमराहाने या दोघांना तंबूचा रस्ता दाखवत दक्षिण आफ्रिकेला अडचणीत आणले. मार्करमनं केलेल्या ३१ धावा या दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातून कोणत्याही फलंदाजाने केलेली सर्वोच्च खेळी ठरली. रियान रिक्लटन २३ (२२), वियान मुल्डर २४ (५१), टोनी झॉर्जी २४ (५५), स्टब्स १५ (७४) आणि काइल व्हेरेइन १६ (३६) यांनी दुहेरी आकडा गाठला. पण एकालाही ही खेळी मोठी करता आली नाही.
भारताकडून पहिल्या डावात या गोलंदाजांनी सोडली खास छाप
जसप्रीत बुमराहनं पहिल्या डावात १४ षटके गोलंदाजी करताना २७ धावा खर्च करून ५ निर्धाव षटकांसह ५ विकेट्स घेतल्या. सिराजनं १२ षटकात ४७ धावा खर्च करताना २ विकेट्सचा डाव साधला. कुलदीप यादवनं १४ षटकात ३६ धावा खर्च करून २ तर अक्षर पटेलनं ६ षटकात २१ धावा खर्च करून एक विकेट घेतली.