India vs South Africa 1st T20I Live Updates : आशिया चषक २०२२ स्पर्धेत झेल सोडल्यामुळे ज्याच्यावर खालच्या पातळीवर टीका झाली त्या अर्शदीप सिंग ( Arshdeep Singh) ला आज चाहत्यांनी डोक्यावर घेतले. मिळालेल्या संधीचं सोनं करताना त्याने एकाच षटकात ३ विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेला धक्का दिला. दीपक चहर, हर्षल पटेल व आर अश्विन यांनी उल्लेखनीय गोलंदाजी करताना भारताच्या विजायाचा मार्ग सोपा केला होता. १०७ धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा व विराट कोहली लगेच माघारी परतले. पण, सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav) लोकेश राहुलसह खिंड लढवली आणि भारताचा विजय पक्का केला. भारताने पहिल्या ट्वेंटी-२०त ८ विकेट्स राखून विजय मिळवताना मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
एकच वादा, सूर्या दादा! Suryakumar Yadav ने मोडला पाकिस्ताच्या रिझवानचा वर्ल्ड रेकॉर्ड अन्..
१०७ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघालाही झटके बसलेच... रोहित शर्मा शून्यावर, तर विराट कोहली ३ धावांवर माघारी परतले. भारताला पॉवर प्लेमध्ये १७ धावाच करता आल्या आणि ट्वेंटी-२० क्रिकेटमधील ही भारताची निचांक कामगिरी ठरली. यापूर्वी २०१६ मध्ये पाकिस्तानविरुद्ध भारताने पॉवर प्लेमध्ये ३ बाद २१ धावा केल्या होत्या. भारताच्या ७ षटकांत २ बाद ३० धावा झाल्या आहेत. सूर्यकुमार यादवने आल्या आल्या दोन खणखणीत सिक्स खेचले. या दोन षटकारांसह सूर्यकुमारने दोन मोठे विक्रमही नाववर केले. कॅलेंडर वर्षात ट्वेंटी-२०त सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजाचा विक्रम त्याने नावावर केला.
सूर्याने २०२२मध्ये ७००+ धाव करून शिखर धवनचा २०१८चा ६८९ धावांचा विक्रम मोडला. शिवाय कॅलेंडर वर्षात सर्वाधिक ४४ षटकार मारणारा फलंदाजही तो बनला. त्याने पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानचा ( ४२) २०२१मध्ये नोंदवलेला विक्रम मोडला. सूर्यकुमार व
लोकेश राहुल यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना भारताच्या डावाला आकार दिला. सूर्यकुमारने ३३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. लोकेशनेही ५६ चेंडूंत अर्धशतक झळकावले. भारताने ८ विकेट व २० चेंडू राखून सामना जिंकला. सूर्या ३३ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ५० धावांवर, तर लोकेश २ चौकार व ४ षटकारांसह ५१ धावांवर नाबाद राहिला.
अर्शदीप सिंग ( Arshdeep Singh) आणि दीपक चहर ( Deepak Chahar) यांनी आज कमालीची गोलंदाजी केली. या दोघांनी २.३ षटकांत दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ माघारी पाठवला. १५ चेंडूंत ९ धावा व ५ विकेट्स अशी दयनीय अवस्था केली. २००७मध्ये आफ्रिकेने वेस्ट इंडिजविरुद्ध १० धावांत निम्मा संघ गमावला होता. केशव महाराजने ( Keshav Maharaj) उल्लेखनीय कामगिरी करून भारतासमोर समाधानकारक लक्ष्य उभे केले. दीपक चहरने ४ षटकांत २४ धावा देताना २ विकेट्स घेतल्या. आर अश्विनने ४-१-८-० अशी अप्रतिम गोलंदाजी केली. अर्शदीपने ४ षटकांत ३२ धावांत ३ विकेट्स घेतल्या. हर्षल पटेलने २६ धावांत २ विकेट्स घेतल्या. एडन मार्कराम ( २५) व वेन पार्नेल ( २४) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. महाराजने ३५ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.