India vs South Africa 1st ODI Live Updates : ट्वेंटी-२० मालिकेतील शतकवीर डेव्हिड मिलर आणि हेनरिच क्लासेन यांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद १३९ धावांची भागीदारी केली. शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव व रवी बिश्नोई यांनी विकेट घेत भारताला सामन्यात कमबॅक करून दिले होते, परंतु गचाळ क्षेत्ररक्षणाने घात केला. आवेश खानच्या ( Avesh Khan) एका षटकात मिलर व क्लासेन या दोघांनाही भारतीय खेळाडूंनी जीवदान दिले. मोहम्मद सिराज व रवी बिश्नोई यांनी सोडलेले झेल पाहून आवेशचा पारा चढला. भारताच्या स्टार खेळाडूंना पुढच्याच चेंडूवर बॉल बॉय ( Ball Boy) ने आरसा दाखवला.
क्विंटन डी कॉक आणि यानेमन मलान ( २२) यांनी पहिल्या विकेटसाठी ४९ धावा जोडल्या. शार्दूल ठाकूरने ही जोडी तोडली आणि मलानला २२ धावांवर श्रेयस अय्यरकरवी झेलबाद केले. टेम्बा बवुमा ( ८) याचा शार्दूलने त्रिफळा उडवला. क्विंटन व हेनरिच क्लासेन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु रवी बिश्नोईने महत्त्वाची विकेट टिपली. ५४ चेंडूत ५ चौकारांसह ४८ धावा करणाऱ्य़ा क्विंटनला त्याने पायचीत केले. शार्दूलने ८-१-३५-२ अशी कामगिरी केली. कुलदीपने ८ षटकांत ३९ धावा देत १ विकेट घेतली. अखेरच्या षटकांत मिलर व क्लासेन यांनी फटकेबाजीला सुरुवात केली.
![]()
मिलर व क्सासेन यांनी ८५ चेंडूंत शतकी भागीदारी पूर्ण केली. ६४ धावांवर क्लासेनने उत्तुंग फटका मारला, परंतु मोहम्मद सिराजला चेंडू टिपता आला नाही. पुढच्याच चेंडूवर मिलरने खणखणीत फटका मारला आणि यावेळेस रवी बिश्नोईने झेल टाकला. हे पाहून आवेश खान संतापल. त्यानंतर इशान किशनकडून मिस फिल्ड झाल्याने आफ्रिकेला चौकार मिळाला आणि आवेशच्या रागात भर पडली. त्यानंतर खेचलेला चेंडू सीमापार गेला अन् तेथे उभ्या असलेल्या बॉल बॉयने सुरेख झेल घेतला. आवेशच्या त्या षटकात १६ धावा आल्या. आवेशने ८ षटकांत ५१ धावा दिल्या.
बिश्नोई महागडा गोलंदाज ठरला, त्याने ८ षटकांत ६९ धावा देत १ विकेट घेतली. क्लासेनने ६५ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह नाबाद ७४ धावा केल्या, तर मिलर ६३ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ७५ धावांवर नाबाद राहिला. आफ्रिकेने ४ बाद २५० धावा केल्या. या दोघांनी १०६ चेंडूंत १३९ धावांची भागीदारी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"