Join us

IND vs PAK, Asia Cup 2022: "एक सोडलेला झेल..."; अर्शदीपच्या नावाने युवराज सिंगचं ट्विट

अर्शदीपकडून सुटलेल्या कॅच भारताला चांगलाच महागात पडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 16:24 IST

Open in App

IND vs PAK: सध्या आशिया चषकाचा (Asia Cup 2022) थरार रंगला आहे. यूएईच्या धरतीवर सुरू असलेली ही स्पर्धा आता मुख्य टप्प्यात येऊन पोहोचली आहे. रविवारी झालेल्या भारत आणि पाकिस्तानच्या सामन्यात पाकिस्तानने ५ गडी राखून शानदार विजय मिळवला. भारतीय संघाने जोरदार कमबॅक करून सामना अखेरच्या षटकापर्यंत नेला. मात्र विजय मिळवण्यात अपयश आले. शेवटच्या षटकांत विजयासाठी ७ धावांची आवश्यकता असताना पाकिस्तानने १ चेंडू राखून सामना आपल्या नावावर केला. मात्र भारतीय संघाचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंगने (Arshdeep Singh) याने आसिफ अलीचा झेल सोडला. त्यानंतर आसिफ अलीला ८ चेंडूत १६ धावा केल्या आणि विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यामुळे त्याला टीकाकारांचा सामना करावा लागत आहे. पण युवराज सिंगने (Yuvraj Singh) वादात उडी घेत अर्शदीपची पाठराखण केली.

"जर तुम्ही भारत विरूद्ध पाकिस्तान सामना पाहताना सीटच्या काठावर बसून असता, तर मैदानावर खेळताना खेळाडूंवर किती दबाव असेल याची तुम्ही कल्पना करा. एक सोडलेला झेल एखाद्या खेळाडूची क्षमता ठरवू शकत नाही. आपण क्रिकेटप्रेमी राष्ट्र म्हणून संघटित होण्याची आणि तरुणांवर टीका करण्याऐवजी त्यांना पाठिंबा देण्याची गरज आहे. अर्शदीप, तू कणखर राहा", अशा शब्दांत युवराज सिंगने अर्शदीपची पाठराखण केली.

दरम्यान, आसिफ अलीचा झेल सोडल्यानंतर त्याने संधीचा फायदा घेत चौकार आणि षटकार लगावले. अखेर भारताला स्पर्धेत पराभव पत्करावा लागला. अर्शदीपने अखेरचे षटक टाकून झेल सोडल्याची भरपाई करण्याचा प्रचंड प्रयत्न केला, पण सामना भारताकडे वळवण्याचा त्याचा प्रयत्न अपयशी ठरला. त्यामुळेच अर्शदीपवर टीका केली गेली. परंतु, भारतीय संघातील आजी-माजी खेळाडूंनी त्याची पाठराखण केली.

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीनेही पत्रकार परिषदेत अर्शदीप सिंगची पाठराखण केली. "जेव्हा मी पाकिस्तानविरूद्ध पहिल्यांदा खेळलो होतो, तेव्हा मी खराब शॉर्ट मारून बाद झालो होतो. त्यानंतर मला वाटले की मी कधीच खेळू शकत नाही. प्रत्येक खेळाडूला वाईट वाटते, मात्र संघातील वातावरण खूप चांगले आहे. प्रत्येकजण आपल्या चुका सुधारून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो. हा एक खेळाचा भाग आहे", असे विराट कोहली म्हणाला.

टॅग्स :एशिया कप 2022भारत विरुद्ध पाकिस्तानयुवराज सिंगभारतीय क्रिकेट संघ
Open in App