Shahid Afridi on Pakistan PCB, IND vs PAK T20 World Cup 2026: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध अनेक वर्षांपासून तणावाचे आहेत. त्यातच पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर नंतर हे संबंध अधिकच चिघळले. पाकिस्तानकडे आशिया चषकाचे यजमानपद होते, तेव्हा भारताचे सर्व सामने पाकिस्तानबाहेर दुबईत खेळवण्यात आले होते. तसेच भारताकडे यजमानपद असलेल्या टी२० विश्वचषकातील पाकिस्तानचे सर्व सामने भारताबाहेर श्रीलंकेत आयोजित करण्यात आले आहेत. पाकिस्तान सरकारने १५ फेब्रुवारी रोजी श्रीलंकेतील कोलंबो येथे होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार घालण्याचा अजब निर्णय घेतला आहे. असे न करण्याचा सल्ला ICC कडून देण्यात आला आहे. त्यातच पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
शाहिद आफ्रिदीचा ICCला सल्ला
"जेव्हा राजकारणामुळे चर्चेची दारं बंद होतात तेव्हा क्रिकेटमुळे ही दारं उघडू शकतात असं मला नेहमी वाटायचं. पाकिस्तानचा संघ टी२० वर्ल्डकपमध्ये भारताविरूद्ध खेळणार नाही हा निर्णय पश्चात्ताप करण्यासारखा आहे, पण मी माझ्या सरकारच्या निर्णयामागे ठाम उभा आहे. आयसीसी ही संस्था नि:पक्षपाती, स्वतंत्र आणि सर्व सदस्यांसाठी समान असल्याचे सिद्ध करण्याची आणि मोठे निर्णय घेण्याची संधी या प्रकरणात आयसीसीकडे आहे," असे शाहिद आफ्रिदीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
![]()
बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय
बीसीसीआयने या मुद्द्यावर मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचा संघ भारताविरूद्ध खेळायला तयार नसला, तरी भारतीय क्रिकेट संघ (BCCI) आयसीसीच्या प्रोटोकॉलचे पालन करत श्रीलंकेचा प्रवास करणार आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनुसार, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ नियोजित वेळापत्रकानुसार कोलंबोला जाईल. संघ तिथे सराव करेल, पत्रकार परिषदेला उपस्थित राहील आणि सामन्याच्या दिवशी वेळेवर स्टेडियममध्ये पोहोचेल. त्यानंतर पाकिस्तानचा संघ न आल्यास 'वॉकओव्हर' केले जाईल.
वॉकओव्हरचा नियम:-
आयसीसीच्या नियमांनुसार, जर एक संघ नाणेफेकीसाठी (Toss) मैदानात उपस्थित राहिला आणि दुसरा संघ आला नाही, तर सामनाधिकारी (Match Referee) उपस्थित असलेल्या संघाला 'वॉकओव्हर' घोषित करतात. याचा अर्थ भारतीय संघाला सामना न खेळताच २ गुण मिळतील.