IND vs PAK T20 World Cup 2026: भारतीय संघ यंदाच्या टी२० विश्वचषकात दमदार वाटचाल करत आहे. साखळी फेरीच्या सामन्यांमध्ये भारताने चारही सामने जिंकले आणि आपली सुपर-८ मधील जागा पक्की केली. भारताच्याच गटात असलेल्या पाकिस्तानला सुपर-८ मध्ये जागा मिळवण्यासाठी थोडी जास्त मेहनत करावी लागली. टीम इंडियाने पाकिस्तानला सहज मात दिली. त्यामुळे नामिबियाला मोठ्या फरकाने हरवून पाकिस्तानने पुढील फेरी गाठली. असे असूनही, एका बाबतीत पाकिस्तानी संघ हा भारतीय संघालाही वरचढ ठरताना दिसला.
पाकिस्तानने 'या' गोष्टीत मारली बाजी
टी२० विश्वचषकात सुपर ८ मध्ये पोहोचलेल्या संघांच्या फिरकीपटूंनी अप्रतिम कामगिरी केली आहे. त्यातही पाकिस्तानच्या फिरकीपटूंनी भारतीय फिरकीपटूंनाही मागे टाकले आहे. त्यांनी सर्वोत्तम कामगिरी करून दाखवली आहे. पाकिस्तान पाठोपाठ श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी सर्वोत्तम कामगिरी केली आहे, तर भारतीय फिरकीपटू तिसऱ्या स्थानावर आहेत. आतापर्यंतची सर्वात वाईट कामगिरी न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या फिरकीपटूंची आहे. सुपर ८ मध्ये पोहोचलेल्या आठ संघांमध्ये प्रत्येक फिरकीपटूने किती विकेट घेतल्या आहेत ते जाणून घेऊया.
पाकिस्तान फिरकी गोलंदाजीत अव्वल
पाकिस्तानकडे टी२० विश्वचषकात फिरकी गोलंदाजांचे आक्रमक आक्रमण आहे. त्यामुळे त्यांच्या फिरकी गोलंदाजांनी आतापर्यंत सर्वाधिक २६ बळी घेतले आहेत. पाकिस्तान उस्मान तारिक, मोहम्मद नवाज, सैम अय्युब, सलमान आगा आणि शादाब खान सारखे फिरकी गोलंदाज मैदानात उतरवत आहे. या फिरकी गोलंदाजांनी भारत वगळता सर्व संघांविरुद्ध चांगली कामगिरी करून दाखवली आहे.
श्रीलंका क्रमांक २, भारत क्रमांक ३...
श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी साखळी टप्प्यात २१ बळी घेतले आहेत. पाकिस्तान नंतर दुसऱ्या क्रमांकावर त्यांचा नंबर आहे. वेल्लालागे, तीक्षणा आणि दुशन हेमंथा यांनी साखळी टप्प्यात चांगली कामगिरी केली. त्यानंतर भारताच्या फिरकीपटूंनी १७ बळी घेतले आहेत. भारतीय फिरकीपटू बळी घेण्याच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर असले, तरीही त्यांनी कमी धावा देण्याच्या बाबतीत अव्वल स्थान मिळवले आहे.