दुबई: आज (२८ सप्टेंबर) क्रिकेट जगतातील सर्वात मोठा हाय-व्होल्टेज सामना रंगणार आहे. आशिया कप २०२५ च्या अंतिम फेरीत पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान एकमेकांना भिडणार आहेत. या दोन देशांतील या स्पर्धेतील ही तिसरी लढत आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होणार आहे. यापूर्वी ग्रुप स्टेजमध्ये भारताने पाकिस्तानला ७ विकेट्सने, तर सुपर-४ मध्ये ६ विकेट्सने सहज पराभूत केले होते. आता पुन्हा एकदा पाकिस्तानला धोबीपछाड देण्यासाठी कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघात दोन महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.
या स्पर्धेत भारतासाठी सलामीवीर अभिषेक शर्मा हुकुमाचा एक्का ठरला आहे. त्याने २०४ पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने ३०९ धावा कुटल्या आहेत. फिरकीमध्ये कुलदीप यादवने (१३ विकेट्स) विरोधी संघांना जेरीस आणले आहे. मात्र, मधल्या फळीतील फलंदाजांचे अपयश ही भारतासाठी चिंतेची बाब आहे.
बुमराह-दुबेची एन्ट्री, अर्शदीप-हर्षित बाहेर
अंतिम सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये दोन मोठे बदल निश्चित मानले जात आहेत. श्रीलंकेविरुद्ध विश्रांती दिलेला भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू शिवम दुबे यांचे संघात पुनरागमन होणार आहे. त्यांच्या समावेशामुळे वेगवान गोलंदाज हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग यांना बाहेर बसावे लागेल. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात छोटीशी दुखापत झालेले हार्दिक पंड्या आणि अभिषेक शर्मा पूर्णपणे तंदुरुस्त असून अंतिम सामन्यासाठी उपलब्ध आहेत.
अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग-XI:
भारत: अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.
पाकिस्तान: साहिबजादा फरहान, फखर जमां, सॅम अयुब, सलमान अली आगा (कर्णधार), मोहम्मद हारिस (यष्टीरक्षक), हुसैन तलत, मोहम्मद नवाज, फहीम अशरफ, शाहीन शाह आफ्रिदी, अबरार अहमद आणि हारिस रौफ.