भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेनंतर आता दोन्ही संघात टी २० मालिकेचा थरार पाहायला मिळणार आहे. २१ जानेवारीला दोन्ही संघ नागपूर येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर रंगणाऱ्या लढतीसह पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला सुरुवात करतील. आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघासाठी महत्त्वपूर्ण असेल. सूर्यकुमार यादवसाठी हा सामना खास ठरेल. सध्याच्या घडीला बॅड पॅचचा सामना करत असलेला सूर्यकुमार यादव या सामन्यात मैदानात उतरताच 'सेंच्युरी' साजरी करणार आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सूर्या दादा थेट रोहित-विराटच्या पंक्तीत बसणार
सूर्यकुमार यादव नाणेफेकीसाठी मैदानात उतरला की, आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये तो शंभर सामने खेळण्याचा नवा विक्रम आपल्या नावे करेल. आतापर्यंत फक्त तीन भारतीय खेळाडूंनीच शंभर टी-२० सामने खेळले आहेत. रोहित शर्मा या यादीत सर्वात आघाडीवर आहे. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीत १५९ सामने खेळले आहेत. त्यापाठोपाठ विराट कोहली १२५ सामन्यांसह दुसऱ्या क्रमांकावर असून हार्दिक पांड्याच्या नावे १२४ सामने खेळण्याचा विक्रम आहे.
Virat Kohli: विराट कोहलीचा ऐतिहासिक पराक्रम; रिकी पॉन्टिंगचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला!
टी-२० क्रिकेटमध्ये ४०० षटकारांचा टप्पा गाठण्याचीही संधी
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी फॉर्म परत मिळवण्यासाठी कर्णधार सूर्यकुमार यादवसाठी न्यूझीलंडविरुद्धची मालिका महत्त्वपूर्ण ठरेल. या मालिकेतील पहिल्या सामन्यात शंभर टी-२० सामने खेळण्याचा विक्रमाला गवसणी घातल्यावर भात्यातील फटकेबाजीचा नजराणा पेश करत त्याला छोट्या प्रकारात मोठा आणि धमाकेदार विक्रम नोंदवण्याची देखील संधी आहे. सूर्यकुमार यादवनं आतापर्यंत या प्रकारातील ३४६ सामन्यात ३९५ षटकार मारले आहेत. पाच सामन्यांच्या मालिकेत पाच षटकारासह त्याला टी-२० मध्ये ४०० षटकारांचा डावही साधता येईल.
सूर्यकुमार यादवसाठी २०२५ हे वर्ष भयावह स्वप्नासारखेच
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय टी-२० संघ सातत्याने दमदार कामगिरी करत आहे. पण कर्णधार सूर्याच्या बॅटला मात्र 'ग्रहण' लागल्याचे दिसून आले. गतवर्षी २१ टी२० सामन्यांत त्याने१३.६२ च्या सरासरीसह फक्त २१८ धावा केल्या आहेत. शतक तर लांबच, पण त्याला एकही अर्धशतक झळकवता आलेले नाही. वर्ल्ड कप स्पर्धेआधी नव्या वर्षात तो नवी आणि दमदार सुरुवात करणार का? ते पाहण्याजोगे असेल.