भारतीय संघानं दुबईच्या मैदानात इतिहास रचला. न्यूझीलंडच्या संघानं दिलेल्या धावांचा पाठलाग करत टीम इंडियानं घरच्या मैदानावर (वनडे वर्ल्ड कप २०२३) अधूरं राहिलेले स्वप्न मिनी वर्ल्ड कपच्या रुपात साकार करत १२ वर्षांनी आयसीसी वनडे इवेंट गाजवला. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने व्हाइट ब्लेजरसह दिमाखात ट्रॉफी उंचावली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रोहित शर्मानं परंपरा जपली
आयसीसी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर रोहितच्या कॅप्टन्सीत टीम इंडियानं आयसीसीची दुसरी ट्रॉफी पटकावली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावल्यावर कॅप्टन रोहित शर्मानं गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियात दिसलेली परंपरा कायम ठेवत हर्षित राणा आणि पहिली वहिली आयसीसी स्पर्धा खेळणाऱ्या वरुन चक्रवर्तीकडे ट्रॉफी दिल्याचा सीन पाहायला मिळाला. त्यानंतर सेलिब्रेशनवेळी श्रेयस अय्यरनं २०१३ च्या आठवणी जाग्या करणाऱ्या विराट कोहलीच्या डान्स स्टेप्सची कॉपी केली. हा सीन बघावा अन् बघत बसावा असाच काहीसा होता.
अय्यरनं केली विराट कोहलीची कॉपी
याआधी २०१३ मध्ये भारतीय संघानं आयसीसी ट्रॉफी जिंकली होती. धोनीच्या नेतृत्वाखाली ट्रॉफी जिंकल्यावर त्यावेळी विराट कोहलीचा डान्स हा चांगलाच लोकप्रिय झाला होता. श्रेयस अय्यरच्या डान्स स्टेप्स पुन्हा एकदा त्या जुन्या आणि खास आठणींना उजाळा देणाऱ्या ठरल्या. अय्यरनं फोटोशूट करताना भन्नाट डान्स करत किंग कोहलीची कॉपी करत मैफिल लुटल्याचे पाहायला मिळाले.
संघ एक नंबरच, पण सर्वांनी योगदान दिलं अन् चॅम्पिनय बनले
भारतीय संघ हा एक नंबर आहे, त्यात कुणाचही दुमत नाही, पण घरच्या मैदानात झालेली आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धा आणि आगामी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची फायनल गाडी चुकल्यामुळे टीम इंडिया फक्त कागदावरच शेर आहे का? असा प्रश्न निर्माण झाला होता. पण चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत प्रत्येक खेळाडूनं बहुमूल्य योगदान देत संघाला चॅम्पियन करत आम्ही कागदावरचेच नाही तर मैदानातील शेर आहोत ते दाखवून दिले. विराट कोहली पहिली मॅच आणि फायनल सोडली तर प्रत्येक मॅचमध्ये चमकला. अय्यरसह अक्षर पटेलनं मध्यफळीतील जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली. लोकेश राुलनं आपल्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवला. रोहित शर्मा फायनलमध्ये मोठा डाव खेळला. यासह अन्य सर्व खेळाडूंनी मोलाचे योगदान देत संघाला पुन्हा एकदा आयसीसी ट्रॉफी जिंकून दिली.