शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला राजकोटच्या मैदानातील वनडे सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. वर्षातील पहिल्या पराभवानंतर टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या स्टार खेळाडूचं वनडे करिअर संपल्यात जमा असल्याची चर्चा रंगू लागली आहे. तोच दुसऱ्या वनडेत टीम इंडियाच्या पराभवास कारणीभूत ठरला, अशी चर्चाही क्रिकेट वर्तुळात रंगू लागली आहे. कोण आहे तो खेळाडू जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टी-२० नंतर वनडेतून निवृत्ती घेण्याची वेळ?
भारतीय संघाने २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत जेतेपद पटकावल्यावर कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहलीशिवाय आणखी एका स्टार क्रिकेटरनं छोट्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती. तो खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून तो रवींद्र जडेजा आहे. छोट्या फॉरमॅमधून निवृत्ती घेतल्यावर जड्डू वनडे आणि कसोटीत सक्रीय आहे. कसोटीत त्याने धमकही दाखवली. पण वनडेत तो टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या मैदानातील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतही तो विकेट लेस राहिला. आता न्यूझीलंडविरुद्धही तो गोलंदाजीसह फलंदाजीत सपशेल अपयशी ठरल्याचे दिसत आहे. त्यामुळेच या स्टार क्रिकेटरने वनडेतून निवृत्ती घेण्याची वेळ आली आहे, अशी चर्चा रंगू लागली आहे.
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात ठरला फ्लॉप
भारत-न्यूझीलंड यांच्यातील वनडोदराच्या मैदानातील पहिल्या वनडेमध्ये रवींद्र जडेजाने ९ षटकांत ५६ धावा खर्च केल्या. यात त्याला एकही विकेट मिळाली नाही. राजकोट येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यातही परिस्थिती फारशी वेगळी नव्हती. जडेजाने ४४ चेंडूत फक्त २७ धावा केल्या. ज्यामध्ये एकच चौकार होता. गोलंदाजीत त्याने ८ षटकांत ४४ धावा खर्च केल्या. यावेळीही विकेटची त्याची पाटी कोरीच राहिली. या कामगिरीनंतर तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारतीय संघ त्याला प्लेइंग इलेव्हनमधून आउट करणार का? ते पाहण्याजोगे असेल.
आगामी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संधी मिळणं 'मुश्किल', कारण...
रवींद्र जडेजाच्या कामगिरीत सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे, त्याच्या जागी अक्षर पटेल हा एक उत्तम पर्याय टीम इंडियाकडे आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा ज्या पद्धतीने खेळत आहेत, त्यावरून ते २०२७ च्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघात स्थान मिळवतील. पण रवींद्र जडेजावर त्याआधी निवृत्ती घेण्याची वेळ येईल, अशीच काहीशी परिस्थिती सध्या दिसून येत आहे.