Sanju Samson Last Chance : टी २० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेच्या यंदाच्या हंगामासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. त्याआधी न्यूझीलंडविरुद्धच्या द्विपक्षीय टी-२० मालिका विजयासह भारतीय संघाने आपले शक्तीप्रदर्शन केले आहे. अभिषेक शर्माचा धमाकेदार फॉर्म, कर्णधार सूर्यकुमार यादवचं दमदार कमबॅक आणि इशान किशनच्या शानदार शोमुळे टीम इंडियाची फलंदाजी अधिक भक्कम दिसत आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भरवसा ठेवला तो बिन कामाचा निघाला, आता...
पण संजू सॅमसनसाठी मात्र धोक्याची घंटा वाजल्याचे चित्र या मालिकेत निर्माण झाले आहे. उप कर्णधार असलेल्या शुभमन गिलला कामगिरीतील सातत्याच्या अभावामुळे बाहेर काढत ज्या संजू सॅमसनवर विश्वास दाखवला तो चारही सामन्यात अपयशी ठरला. आघाडीच्या फलंदाजीतील सातत्यपूर्ण तो एकाच पॅटर्नमध्ये आउट होताना दिसला. ही गोष्ट आगामी टी-२० वर्ल्ड कपसाठी प्लेइंग इलेव्हनमधून त्याचा पत्ता कट करणारी ठरू शकते. भारतीय संघ वर्ल्ड कप मोहिमेला सुरुवात करण्याआधी तिरुवनंतपुरमच्या मैदानात न्यूझीलंडविरुद्ध पाचवा आणि अखेरचा टी-२० सामना खेळणार आहे. कदाचित घरच्या मैदानातील हा सामना संजूसाठी शेवटची संधी ठरु शकतो.
T20 World Cup 2026 : वॉशिंग्टन सुंदर १०० टक्के फिट नाही; 'मॅच-अप्स'च्या मास्टर प्लॅनसह टीम इंडियाचा 'वेट अँ...
४ डावांत फक्त ४० धावा
न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० मालिकेतील पहिल्या चार सामन्यात संजू सॅमसन सातत्याने अपयशी ठरला. चार सामन्यांतील चार डावात त्याने फक्त ४० धावा केल्या आहेत. एकाही सामन्यात २५ धावांचा आकडा तो गाठू शकलेला नाही. या मालिकेतील १० च्या सरासरीने केलेली कामगिरी टीम इंडियासह त्याच्यासाठी धोक्याची घंटाच आहे.
संजूच्या जागी टीम इंडियाकडे सर्वोत्तम पर्याय तयार
हैदराबाद, डरबन आणि जोहान्सबर्गमध्ये खेळलेल्या काही दमदार खेळीच्या जोरावर संजू सॅमसन याने संघातील आपली दावेदारी मजबूत केली होती. याच कामगिरीच्या जोरावर शुभमन गिलला बाहेरचा रस्ता दाखवून त्याच्यावर संघ व्यवस्थापनाने विश्वास दाखवला. पण तो सातत्याने अपयशी ठरला. विशाखापट्टणमच्या मैदानात टॉप ऑर्डरमधील फलंदाजांनी नांगी टाकली तर काय होऊ शकते, याची झलक पाहायला मिळाली आहे. त्यामुळे टीम इंडिया संजूला सलामीच्या रुपात खेळवण्यासंदर्भात पुन्हा एकदा विचार करु शकते. दुसऱ्या विकेट किपर बॅटरच्या रुपात इशान किशन याने जवळपास दोन वर्षांनी टीम इंडियात कमबॅक केले आहे. त्याने धमाकेदार खेळीसह डावाची सुरुवात करण्यासाठीही सर्वोत्तम पर्याय असल्याची झलक संजू अपयशी ठरलेल्या प्रत्येक सामन्यात दाखवून दिली आहे. संजूचं अपयश भरून काढण्याठी टीम इंडिया इशान किशनला विकेट किपर बॅटरच्या रुपात प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देत संजूचा पत्ता कट करू शकते. पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात संजूला शेवटची संधी मिळणार का? तो या संधीचं सोनं करून चुका भरून काढत जुना तोरा दाखवणार का? ते पाहण्याजोगे असेल.