Mitchell Slams Ton As NZ Close In On Series Levelling Win : न्यूझीलंडच्या संघाने राजकोटच्या मैदानातील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियावर पलटवार करत मालिकेत १-१ असा बरोबरीचा डाव साधला आहे. भारतीय संघाने दिलेल्या २८५ धावांचा पाठलाग करताना सलामीवीर स्वस्तात बाद झाल्यावर भारतीय संघ न्यूझीलंडला रोखून मालिका खिशात घालेल, असे वाटत होते. पण न्यूझीलंडनं पलटवार केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जोडी जमली अन् टीम इंडियाचं गणित बिघडलं
विल यंग आणि डॅरिल मिचेल जोडी जमली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १६२ धावांची दमदार भागीदारी करत भारतीय गोलंदाजांचे खांदे पाडले. विल यंग ९८ चेंडूत ८७ धावांची खेळी करुन परतल्यावर डॅरिल मिचेल याने ग्लेन फिलिप्सच्या साथीनं ७ विकेट्स राखून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. डॅरिल मिचेलनं ११७ चेंडूत १३१ धावांची नाबाद खेळी केली. दुसऱ्या बाजूला ग्लेन फिलिप्सनं २५चेंडूत नाबाद ३२ धावांचे योगदान दिले.
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
टीम इंडियाच्या गोलंदाजांना मिळवता आल्या फक्त तीन विकेट्स
भारतीय संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना डेवॉन कॉन्वे आणि हेन्री निकोल्स या जोडीनं न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात केली. न्यूझीलंडच्या धावफलकावर २२ धावा असताना हर्षित राणा याने डेवॉन कॉन्वेचा खेळ खल्लास केला. तो फक्त १६ धावा करून बाद झाला. प्रसिद्ध कृष्णानं ४६ धावांवर न्यूझीलंडच्या संघाला दुसरा धक्का दिला. त्याने फक्त १० धावांचे योगदान दिले. पण सलामी जोडी स्वस्तात बाद झाल्यावर विल यंग आणि डॅरिल मिचेल जोडीनं फक्त डाव सावरला नाही तर टीम इंडियाच्या गोलंदाजांना बॅकफूटवर ढकलत न्यूझीलंडची मालिका विजयाची आस कायम ठेवणारी भागीदारी रचली. २०८ धावांवर कुलदीप यादवनं ही जोडी फोडली, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. वॉशिंग्टन सुंदरच्या जागी संधी देण्यात आलेल्या नितीश कुमार रेड्डीला गोलंदाजीवेळी फक्त दोन षटके मिळाली. मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची विकेटची पाटी कोरीच राहिली.
रविवारी फायनल फैसला
नव्या वर्षातील वडोदराच्या मैदानातील पहिल्या वनडेतील विजयासह भारतीय संघाने दमदार सुरुवात केली. पण दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने दमदार कमबॅक करत मालिकेतील आपले आव्हान कायम राखले आहे. आता रविवारी, १८ जानेवारीला ही मालिका कोण जिंकणार? याचा फैसला होणार आहे. हा सामना इंदूरच्या होळकर मैदानात खेळवण्यात येणार आहे.