Join us

IND vs NZ 1st ODI Live : ६ चेंडूंत ३० धावा! वॉशिंग्टन सुंदरचे जबरदस्त कमबॅक; पण, जगात भारी ठरला टीम साऊदी

India vs New Zealand 1st ODI Live : शिखर धवन आणि शुबमन गिल या जोडीनं भारताला दमदार सुरुवात करून देताना १२४ धावांची भागीदारी केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 10:56 IST

Open in App

India vs New Zealand 1st ODI Live : शिखर धवन आणि शुबमन गिल या जोडीनं भारताला दमदार सुरुवात करून देताना १२४ धावांची भागीदारी केली, परंतु न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी ९ चेंडूंच्या फरकाने दोघांनाही माघारी पाठवले. त्यानंतर रिषभ पंत ( Rishabh Pant) व सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) हेही अपयशी ठरले आणि भारताची धावगती मंदावली. श्रेयस अय्यर व संजू सॅमसन यांनीही सुरूवातीला संथ खेळ केला, परंतु सेट झाल्यावर दोघांनी फटकेबाजी सुरू केली. धवन, गिलपाठोपाठ या सामन्यात अय्यरनेही अर्धशतकी खेळी केली. पण, दुखापतीतून कमबॅक केलेल्या वॉशिंग्टन सुंदरने ( Washington Sundar ) सर्वांची वाहवाह मिळवली. भारताने शेवटच्या २० षटकांत १२२ धावा चोपल्या.

 न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. शिखर आणि शुबमन या जोडीने भारताला १२४ धावांची दमदार सुरूवात करून दिली.  या जोडीला २४व्या षटकात नजर लागली. ल्युकी फर्ग्युसनच्या षटकात पहिल्याच चेंडूवर शुबमन झेलबाद झाला. त्याने ६५ चेंडूंत १ चौकार व ३ षटकारासह ५० धावा केल्या. पाठोपाठ नवव्या चेंडूवर ( २४.३ ) धवन बाद झाला. टीम साऊदीने ही विकेट घेतली आणि भारताचे दोन्ही सलामीवीर १२४ धावांवर माघारी परतले. धवनने ७७ चेंडूंत १३ चौकारांच्या मदतीने ७२ धावा केल्या. साऊदीची ही वन डे क्रिकेटमधील २०० वी विकेट ठरली.  

दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर भारताला पहिल्या चौकारासाठी ७ षटकांची वाट पाहावी लागली आणि तोही नशीबाने मिळाला. पण, पुढच्याच चेंडूवर ल्युकी फर्ग्युसनने भारताला धक्का देताना रिषभ पंतचा त्रिफळा उडवला. रिषभ १५ धावांवर, तर सूर्यकुमार यादव ४ धावांवर फर्ग्युसनच्याच गोलंदाजीवर माघारी परतला. श्रेयस अय्यर व संजू सॅमसन यांनी भारताला पुन्हा पुनरागमन करून दिले. या दोघांनी ७७ चेंडूंत ९४ धावांची भागीदारी केली. मिल्नेने ही भागीदारी संपुष्टात आणताना संजूला ३६ धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने किवी गोलंदाजांना धू धू धुतले. श्रेयस ७६ चेंडूंत ४ चौकार व तितकेच षटकार खेचून ८० धावांवर बाद झाला. सुंदरने १६ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारासह नाबाद ३७ धावा केल्या. भारताने ७ बाद ३०६ धावा उभ्या केल्या. 

टीम साऊदीचा वर्ल्ड रेकॉर्ड - ट्वेंटी-२०त १००+, वन डेत २००+ आणि कसोटीत ३००+ विकेट्स घेणारा टीम साऊदी हा जगातील पहिला गोलंदाज ठरला. त्याच्या नावावर कसोटीत ३४७ विकेट्स व ट्वेंटी-२०त १३४ विकेट्स आहेत आणि आज त्याने वन डेत २०० विकेट्सचा टप्पा ओलांडला. डॅनिएल व्हिटोरी ( २९७), कायले मिल्स ( २४०), ख्रिस हॅरीस ( २०३) व ख्रिस क्रेन्स ( २००) यांच्यानंतर किवींसाठी साऊदीने हा पराक्रम केला.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडवॉशिंग्टन सुंदरश्रेयस अय्यरशुभमन गिलशिखर धवन
Open in App