India vs Namibia, 18th Match : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर रंगलेल्या टी-२० वर्ल्ड कप सामन्यात भारतीय संघाने नामिबियाचा एकतर्फी पराभव करत सलग दुसरा विजय नोंदवला. या दिमाखदार कामगिरीसह भारताने कोलंबोमध्ये होणाऱ्या हायव्होल्टेज सामन्याआधीच पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे. २०० पारची लढाई ९३ धावांनी जिंकत टीम इंडियाने आपल्या खात्यात ४ गुण जमा करत ‘अ’ गटात सर्वोच्च नेट रनरेटच्या जोरावर अव्वल स्थान पटकावले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नामिबियाचा डाव ११६ धावांवर खल्लास
नामिबियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. ईशान किशन आणि हार्दिक पांड्याच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने निर्धारित २० षटकांत २०९ धावा करत २१० धावांचे आव्हान उभे केले. प्रत्युत्तरात नामिबियाचा संघ ११६ धावांत आटोपला. भारतीय संघाने हा सामना ९३ धावांनी खिशात घातला. भारताकडून वरुण चक्रवर्तीनं सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
T20 World Cup 2026 : टीम इंडियाचा जलद 'सेंच्युरी'चा पराक्रम! नामिबिया विरुद्ध 'द्विशतक' झालं, पण...
IND v NAM हायलाइट मॅच
अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर हार्दिक पांड्या ठरला सामनावीर
फलंदाजीत अर्धशतकी खेळीसह मैफिल लुटणाऱ्या हार्दिक पांड्याने गोलंदाजीतही चमक दाखवली. २८ चेंडूत ५२ धावांच्या दमदार खेळीनंतर त्याने ४ षटकांत २१ धावा खर्च करत दोन विकेट्स घेतल्या. नामिबियाविरुद्धच्या सामन्यात आपल्या अखेरच्या षटकात पांड्या हॅटटट्रिकवरही पोहचला होता. ही संधी हुकली. पण त्याने आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या दोरावर सामनावीराच्या पुरस्कारावर नाव कोरले.
पॉवर प्लेमध्ये पुन्हा दिसली अर्शदीप सिंगची पॉवर
नामिबियाविरुद्धच्या सामन्यात धावांचा बचाव करताना गोलंदाजीत हार्दिक पांड्याने पहिले षटक टाकले. पॉवर प्लेमध्ये अर्शदीप सिंगनं आपला रुबाब कायम ठेवत टीम इंडियाला पहिली विकेट मिळवून दिली. नामिबियाचा सलामीवीर फ्रायलिंकच्या रुपात त्याने टीम इंडियाला पहिली विकेट मिळवून दिली. त्यानंतर वरुण चक्रवर्ती पिक्चरमध्ये आला. त्याने नामिबियाच्या तिघांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. याशिवाय जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांनीही प्रत्येकी १-१ विकेट घेत भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.