No Celebration after Team India Win, IND vs ENG: इंग्लंड विरूद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत टीम इंडियाने रोमांचक विजय मिळवला. पहिल्या डावात भारताने २२४ तर इंग्लंडने २४७ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताने दुसऱ्या डावात ३९६ धावा करत इंग्लंडला ३७४ धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना हॅरी ब्रूक आणि जो रूट यांच्या शतकांमुळे इंग्लंडचा विजय दृष्टीपथात होता. पण शेवटच्या दिवशी इंग्लंडला ३५ धावांची गरज असताना, भारतीय गोलंदाजांनी ४ गडी बाद करत संघाला विजय मिळवून दिला. भारताने ऐतिहासिक विजय मिळवला तरीही खेळाडूंनी जोरदार सेलिब्रेशन करणे का टाळले, जाणून घ्या.
टीम इंडियाने विजय का साजरा केला नाही?
पाच कसोटी सामन्यांची ही मालिका भारतीय संघासाठी खूप आव्हानात्मक होती. युवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध शानदार कामगिरी केली. मालिकेच्या नाट्यमय समाप्तीनंतर, भारतीय ड्रेसिंग रूममध्ये उत्सवाचे वातावरण असेल अशी अपेक्षा होती. परंतु खेळाडूंनी उत्सवाऐवजी विश्रांती घेणे आणि कुटुंबासोबत वेळ घालवणे पसंत केले. बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, विजयानंतर रात्री कोणतेही मोठे सेलिब्रेशन झाले नाही. ही मालिका खूप काळ चालणारी होती, त्यामुळे खेळाडू थकले होते. खेळाडूंनी एकटे राहणे किंवा कुटुंबियांसोबत वेळ घालवण्याला पसंती दिली. बहुतेक खेळाडू भारतात परतत आहेत, तर काही सुट्टीसाठी इतरत्र जात आहेत.
खेळाडूंचा मायदेशी परतीचा प्रवास
मालिका संपल्यानंतर २४ तासांपेक्षा कमी वेळातच अनेक खेळाडू मायदेशी परतले. शेवटच्या कसोटीत पाच विकेट्स घेऊन भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा मोहम्मद सिराज दुबईमार्गे हैदराबादला जाणार आहे. मंगळवारी सकाळी विमानाने निघालेल्या खेळाडूंमध्ये अर्शदीप सिंग आणि शार्दुल ठाकूर हे देखील होते. दुबईला पोहोचल्यानंतर तेथून हे खेळाडू त्यांच्या संबंधित शहरांना कनेक्टिंग फ्लाइटने जातील.
Web Title: IND vs ENG Why did not Team India celebrate even after their historic win against England here is the reason
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.