Wasim Jaffer India Squad, IND vs ENG Test: IPL सुरू असतानाच क्रिकेटचाहत्यांना आता भारत विरूद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचेही वेध लागले आहेत. २५ मे रोजी १६ खेळाडूंचा संघ इंग्लंडला रवाना होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची अद्याप घोषणा झालेली नसली तरी २४ मे रोजी नवीन कसोटी कर्णधार आणि टीम इंडियाचा संघ जाहीर होऊ शकतो, असे वृत्त आहे. याच दरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफरने त्याच्या आवडीची टीम इंडिया निवडली आहे. त्याने एका खास खेळाडूला १६ जणांच्या संघाचा कर्णधार बनवले आहे, तसेच उपकर्णधार कोण असावा याबद्दलही सांगितले आहे.
कर्णधार-उपकर्णधार कोण?
गेल्या काही दिवसांपासून भारताचा नवा कसोटी कर्णधार कोण यावर बऱ्याच चर्चा सुरु आहेत. जसप्रीत बुमराह, शुबमन गिल, रवींद्र जाडेजा, केएल राहुल आणि रिषभ पंत अशा पाच खेळाडूंच्या नावाची कर्णधारपदासाठी चर्चा सुरू आहे. तशातच इंग्लंड दौऱ्यासाठी वासिम जाफरने अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला कसोटी संघाचा कर्णधार बनवले आहे. शुभमन गिलकडे संघाच्या उपकर्णधारपदाचा भार सोपवण्याचा निर्णय त्याने घेतला आहे.
रोहित शर्माच्या जागी खास खेळाडूला स्थान
वासिम जाफरने यशस्वी जैस्वालला सलामीवीर म्हणून कायम ठेवले आहे. तर केएल राहुलला त्याचा साथीदार म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे. याशिवाय रोहितच्या जागी अभिमन्यू ईश्वरनची संघातील तिसरा सलामीवीर म्हणून निवड केली आहे. जाफरच्या संघात ऋषभ पंत यष्टीरक्षक आहे. त्याने ध्रुव जुरेलला संघात दुसरा यष्टीरक्षक म्हणून ठेवले आहे.
काही ठिकाणी जाफरची द्विधा मनस्थिती
चौथ्या क्रमांकावर कोण खेळेल याबद्दल वसीम जाफर थोडा गोंधळलेला दिसला. त्याने श्रेयस अय्यर आणि करुण नायर या दोघांपैकी एक असे लिहिले आहे. तसेच तिसरा वेगवान गोलंदाज कोण असावा याबाबतही तो गोंधळला. त्याने अर्शदीप, आकाशदीप आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यापैकी एकाची निवड करावी असे म्हटले. वासिम जाफरच्या संघात रवींद्र जाडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर हे दोन फिरकी अष्टपैलू खेळाडू आहेत. याशिवाय, कुलदीप यादव हा संघातील तिसरा फिरकी गोलंदाज आहे. बुमराह व्यतिरिक्त शमी आणि सिराज हे वेगवान गोलंदाजही आहेत. याशिवाय, वेगवान गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू म्हणून शार्दुल ठाकूरचेही नाव संघात आहे.