Join us  

रोहित ओपनर नको, फलंदाजीच्या क्रमात बदल करा; दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय दिग्गजानं सांगितला प्लॅन

सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 12:59 PM

Open in App

IND vs ENG Test Series: सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून बेन स्टोक्सच्या नेतृत्वातील इंग्लंडने विजयी सलामी दिली. पहिल्या डावात चमकदार कामगिरी करून आघाडी मिळवणाऱ्या यजमान भारताला शेवट गोड करता आला नाही. सलामीच्या सामन्यात भारतीय संघाचा धक्कादायकरित्या पराभव झाला. पहिल्या दोन दिवसांत सामन्यावर मजबूत पकड असलेला भारतीय संघ पुढील दोन दिवसांत थेट पराभूत झाला. ओली पोपची झुंजार १९६ शतकी धावांची खेळी आणि चौथ्या डावांत हार्टलीचे ७ बळी यांच्या जोरावर इंग्लंडने अख्खा सामना फिरवला आणि मालिकेत १-० ने आघाडी घेतली.

मायदेशात मालिकेतील पहिलाच सामना गमावणे भारतासाठी मोठा धक्का मानला जात आहे. रविवारी मालिकेतील पहिली कसोटी टीम इंडियाच्या पराभवाने संपली. भारतीय संघाला विजयासाठी २३१ धावांची गरज होती पण भारताचा डाव केवळ २०२ धावांतच आटोपला. पाहुण्यांनी मालिकेत आघाडी घेतल्यानंतर भारतीय संघाचा माजी खेळाडू वसीम जाफरने टीम इंडियाला एक सल्ला दिला आहे.

गिल-जैस्वालने डावाची सुरूवात करावी... वसीम जाफरने सोशल मीडियावर एक पोस्ट करत म्हटले, "मला वाटते की, शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी सलामीला यायला हवे. रोहितने दुसऱ्या कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करावी. गिलने दुसऱ्या क्रमांकावर खेळणे योग्य नाही. त्यामुळे त्याने डावाची सुरूवात केली तर ते योग्य ठरेल. रोहित फिरकी गोलंदाजांचा चांगला सामना करतो. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याला कोणतीही अडचण येणार नाही." 

रवींद्र जडेजा दुसऱ्या सामन्याला मुकण्याची शक्यताभारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हाताच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. हॅमस्ट्रिंगची दुखापत किती गंभीर असेल हे ठरवेल की जाडेजा मालिकेत कधी खेळू शकेल. जरी दुखापत किरकोळ असल्याचे सिद्ध झाले, तरीही पूर्णतः फिट होण्यासाठी एक आठवड्याची विश्रांती दिली जाते. पुढील कसोटी २ फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे होणार आहे. अशा स्थितीत जाडेजा त्या कसोटीतून माघार घेऊ शकतो.

पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद यादव. , मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार) आणि आवेश खान. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडभारतीय क्रिकेट संघयशस्वी जैस्वालरोहित शर्मावासिम जाफरशुभमन गिल