IND vs ENG T20 : कोलकाता : इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताकडून सलामीवीरांची भूमिका कोण बजावेल हे निश्चित आहे पण, अन्य फलंदाजांचा क्रम ठरलेला नाही, याबाबत आम्ही थोडे लवचीक राहू, अशी माहिती उपकर्णधार अक्षर पटेल याने सोमवारी दिली. मालिकेतील पहिला सामना ईडन गार्डनवर बुधवारी होईल. फलंदाजी क्रमात वारंवार होणाऱ्या बदलांविषयी विचारताच अक्षर म्हणाला, 'हा नियम केवळ माझ्यासाठी नव्हे तर संपूर्ण संघासाठी लागू होतो. २०२४ च्या सुरुवातीलाच आम्ही निश्चित केले की, सलामीवीर ठरलेले असतील पण तिसऱ्या ते सातव्या स्थानावर परिस्थिती, संघ संयोजन आणि खेळाची स्थिती यानुसार लवचिकता बाळगली जाईल. कोण कोणत्या स्थानावर खेळेल हे ठरलेले नाही. आम्ही सराव सत्रात हे ठरविणार आहोत. टी-२० त योग्यवेळी योग्य फलंदाजांचा वापर होणे गरजेचे आहे.
तीन तास कसून सराव
सोमवारी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्यासह संघातील सर्व खेळाडूंनी ईडनवर तीन तास कसून सराव केला. इंग्लंडविरुद्ध पहिला सामना २२ जानेवारी रोजी खेळला जाईल. शमीने गोलंदाजी प्रशिक्षक मोनीं मोर्केलच्या मार्गदर्शनात छोट्या रनअपसह सुरुवातीला हळुवार गोलंदाजी केली. नंतर पूर्ण रनअपसह त्याने गोलंदाजीतील गती वाढविली. गोलंदाजीनंतर क्षेत्ररक्षणाचाही सराव केला. अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा या युवा फलंदाजांना त्याने वेग व अचूक टप्प्यांवर भर देत वारंवार अस्त केले.
कठोर निर्णय गरजेचे
'नेतृत्वाची अतिरिक्त जबाबदारी आली की कठोर निर्णय घ्यावेच लागतात. आमच्याकडे स्थिर संघ असल्याने टी-२० त अधिक दडपण नाही. जे घडले ते विसरून पुढील मालिकेत सकारात्मक वाटचाल करणे काळाची गरज आहे. मोहम्मद शमीसारखा वरिष्ठ गोलंदाज संघात परतल्याने मनोबल उंचावले,' असेही अक्षर म्हणाला.
ध्रुव जुरेलची फटकेबाजी सरावादरम्यान यष्टिरक्षक ध्रुव जुरेल याने शमीच्या चेंडूवर काही आक्रमक फटके मारले. सराव संपल्यानंतर शमी मोर्केल यांच्याशी संवाद साधताना दिसला. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीपसिंग याने मात्र सरावात भाग घेतला नाही. जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघानेही येथे सराव केला.