भारत-इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात रंगणार आहे. लॉर्ड्सच्या मैदानातील पराभवामुळे मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी भारतीय संघासाठी हा सामना महत्त्वपूर्ण असेल. चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल अपेक्षित असताना माजी प्रशिक्षक आणि विद्यमान समालोचक रवी शास्त्री यांनी रिषभ पंतसंदर्भात मोठं वक्तव्य केले आहे. प्लेइंग इलेव्हन निवडण्यासाठी त्यांनी टीम इंडियाचा कर्णधार शुबमन गिल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर जोडीला खास सल्ला दिला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पंतच्या फिटनेस संदर्भात प्रश्नचिन्ह
लॉर्ड्स कसोटी सामन्यात रिषभ पंतच्या हाताच्या बोटाला दुखापत झाली होती. जसप्रीत बुमराहचा चेंडू लागल्यानंतर त्याने मैदान सोडल्याचे पाहायला मिळाले. तो दोन्ही डावात फलंदाजी करताना दिसला. पण दुखापत त्याला त्रस्त करत असल्याचेही जाणवले. चौथ्या सामन्यासाठी तो फिट आहे का? ही गोष्ट अजून गुलदस्त्यातच आहे. याच मुद्यावर रवी शास्त्री यांनी टीम इंडियाला सल्ला दिला आहे.
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेऊ नका!
जर रिषभ पंत विकेट किपिंग करण्यासाठी फिट नसेल तर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेऊ नका, असे शास्त्रींनी म्हटले आहे. पंत चांगल्या फॉर्ममध्ये असला तरी फक्त बॅटरच्या रुपात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवणे योग्य ठरणार नाही, असे मत शास्त्रींनी व्यक्त केले आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात रिषभ पंतनं पहिल्या डावात ७४ तर दुसऱ्या डावात ९ धावा केल्या होत्या.
नेमकं काय म्हणाले शास्त्री?
आयसीसीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये शास्त्रींनी पंतसंदर्भात भाष्य केले आहे. ते म्हणाले आहेत की, पंतला फक्त बॅटरच्या रुपात खेळवणं योग्य वाटत नाही. तो यष्टीरक्षणासाठी फिट नसेल तर प्लेइंग इलेव्हनमध्ये घेतल्यावर त्याला क्षेत्ररक्षणासाठी उभे राहावेच लागेल. ग्लोव्ह्जशिवाय त्याला क्षेत्ररक्षण करण्याचा डाव खेळणं ही अधिक जोखीम ठरेल. त्याची दुखापत आणखी वाढण्याची भिती असेल.
पंतच्या दुखापतीवर शुबमन गिलसह सहाय्यक प्रशिक्षकांनी दिली होती अशी प्रतिक्रिया
चौथ्या कसोटीसाठी रिषभ पंत फिट होऊन मैदानात उतरेल, असा विश्वास भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार शुबमन गिल याने व्यक्त केला आहे. याशिवाय गुरुवारी सराव सत्रादरम्यान सहाय्यक प्रशिक्षक रयान टेन डोशेट यांनी मँचेस्टर कसोटीसाठी फिट होण्यासाठी पंत प्रयत्नशील असल्याचे म्हटले होते.