Star Player Injured, Ind vs Eng ODI : भारत आणि इंग्लंड यांच्यात ६ फेब्रुवारीपासून ३ सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या पार्श्वभूमीवर ही मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची असणार आहे. गेल्या काही काळात भारतीय संघाने खूप कमी वनडे सामने खेळले आहेत. अशा परिस्थितीत टीम कॉम्बिनेशन योग्यपणे जुळवून आणण्यासाठी भारताकडे फक्त ३ सामनेच आहेत. दुसरीकडे इंग्लंडची अलिकडची वनडे सामन्यांमधील कामगिरी खूपच खराब आहे. त्यामुळे त्यांनाही या मालिकेकडून खूप अपेक्षा आहेत. तशातच मालिका सुरू होण्यापूर्वी संघाला मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे स्टार खेळाडूला संघाबाहेर व्हावे लागले आहे.
स्टार खेळाडू दोन वनडे सामन्यांना मुकणार!
भारताचा इंग्लंड दौरा आतापर्यंत खूपच वाईट राहिला आहे. ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत त्यांना १-४ असा पराभव पत्करावा लागला. तशातच वनडे मालिकेपूर्वी इंग्लंडवरील दबाव अजून वाढला आहे. टेलिग्राफ स्पोर्टमधील एका वृत्तानुसार, इंग्लंडचा यष्टिरक्षक जेमी स्मिथ हा पायाच्या दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या पहिल्या दोन वनडे सामन्यांमधून बाहेर पडला आहे. जेमी स्मिथने अलीकडेच भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेदरम्यान पदार्पण केले होते.
संघाकडे यष्टीरक्षक कोण?
जेमी स्मिथला टी-२० मालिकेत २ सामने खेळण्याची संधी मिळाली. या दोन सामन्यात मिळून त्याला फक्त २८ धावाच करू शकला आणि त्यानंतर शेवटच्या २ सामन्यांमध्ये खेळू शकला नाही. पण तरीही जेमी स्मिथची अनुपस्थिती इंग्लंडसाठी मोठा धक्का आहे. कारण त्यांच्या संघाला यष्टीरक्षक निवडणे खूप कठीण जाईल. इंग्लंडकडे सध्याच्या संघात फिल साल्ट आणि जोस बटलरच्या रूपाने दोन यष्टिरक्षक-फलंदाज आहेत. जोस बटलरने पायाच्या दुखापतीतून परतल्यानंतर किपिंग केलेली नाही. दुसरीकडे, सॉल्टकडे यष्टिरक्षक म्हणून फक्त तीन वनडे सामन्यांचा अनुभव आहे. अशा स्थितीत आता ही जबाबदारी कोण पार पाडणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.