IND vs ENG 5 Test Shubman Gill Statement On Controversy With Ovel Pitch Curator : अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी स्पर्धेतील भारत-इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना लंडन येथील ओव्हलच्या मैदानात रंगणार आहे. या सामन्याआधी भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिल याने पत्रकार परिषदेत संवाद साधला. यावेळी त्याने कोच गौतम गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यातील वाद अन् बुमराह खेळणार की, नाही यासंदर्भातील प्रश्नावरही भाष्य केले. इथं जाणून घेऊयात शुबमन गिल यासंदर्भात नेमकं काय म्हणाला? यासंदर्भातील सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पिच क्युरेटरसोबतचं वादग्रस्त प्रकरण, गिलनं मोजक्या शब्दांत मांडलं मत
२९ जुलैला भारतीय संघ सरावासाठी मैदानात उतरला होता. यावेळी संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि ओव्हल पिच क्युरेटर ली फोर्टिस यांच्यात शाब्दिक वाद झाल्याचे पाहायला मिळाले. खेळपट्टीपासून दूर राहा, असे सांगितल्यावर गंभीर पिच क्युरेटरवर चांगलाच चिडला होता. आम्हाला शिकवू नको, तू इथून निघ चल ... अशा शब्दांत गंभीरनं राग व्यक्त केला होता. हे प्रकरण चांगलेच गाजताना दिसते आहे. यावर शुबमन गिलनं फार नं बोलता मोजक्या शब्दांत आपली भूमिका मांडली.
पिच क्युरेटरसोबतच्या वादावर नेमकं काय म्हणाला शुबमन गिल?
ओव्हल कसोटी आधी मैदानात पिच क्युरेटरसोबतच्या वादग्रस्त ठरत असलेल्या मुद्यावर भाष्य करताना शुबमन गिल म्हणाला की, " सामन्या आधी प्रशिक्षकाला खेळपट्टी पाहण्याचा पूर्ण अधिकार असतो. क्युरेटर ते का करू देत नव्हते ते समजण्यापलिकडचे होते. जर तुम्ही रबरी स्पाइक घातले असतील किंवा अनवाणी असाल तर खेळपट्टीला कोणताही धोका नसतो. गेल्या चार सामन्यांमध्ये अशी कोणतीही समस्या आली नव्हती", असेही शुबमन गिलनं यावेळी बोलून दाखवलं.
जसप्रीत बुमराहसंदर्भात पुन्हा संभ्रम; कारण...
भारतीय संघाच्या कर्णधाराला प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहला पाचव्या सामन्यात खेळवणार का? असा प्रश्नही विचारण्यात आला होता. यावर गिल म्हणाला आहे की, उद्या मॅच आधी खेळपट्टी पाहिल्यावर यासंदर्भातील निर्णय घेऊ. सध्याच्या घडीला खेळपट्टीवर हिरवे गवत दिसत असल्याचेही त्याने सांगितले. बुमराह फक्त तीन सामने खेळणार हे आधीच ठरलं होतं. ते तो खेळलाही. पण अखेरच्या कसोटीत तो खेळणार का? हा मुद्दा अजूनही चर्चेत आहे. त्यात गिलनं त्यासंदर्भातील संभ्रम आणखी वाढवणारे उत्तर दिले आहे.