इंग्लंड विरुद्धच्या मँचेस्टर कसोटी सामन्यात भारतीय संघानं अशक्यप्राय वाटणारा सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले. मॅच ड्रॉ झाल्यावर टीम इंडियाचे संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पत्रकार परिषदेत आपल्या खास शैलीत वेगवेगळ्या गोष्टींवर भाष्य केले. "मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." असं म्हणत गंभीर यांनी त्यांच्या जुन्या इनिंगची आठवण करुन दिल्यावर "छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी नए दौर में लिखेंगे, मिल कर नई कहानी हम हिंदुस्तानी" हे गाणं गायल्याचे पाहायला मिळाले. इथं जाणून घेऊयात त्यामागची खास स्टोरी
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मँचेस्टर कसोटी गंभीरची न्यूझीलंडमधील खंबीर खेळी
टीम इंडियाने मँचेस्टर कसोटी सामना अनिर्णित राखण्यात यश मिळाल्यावर पत्रकार परिषदेत कोच गौतम गंभीर यांना नेपीयर कसोटीतील खेळीचा दाखला देत प्रश्न विचारण्यात आला होता. केएल राहुल आणि कर्णधार शुबमन गिल यांच्यासह वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजाच्या खेळीकडे कसे बघता? त्यांची ही खेळी पहिल्यावर २००९ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध स्वत: केलेली खंबीर खेळी आठवली का? असा प्रश्न गौतम गंभीर यांना विचारण्यात आला होता.
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..."
यावर गंभीर म्हणाले की, मला माझी कोणतीही इनिंग आठवत नाही. मी जे केलं ते इतिहास जमा झालय. ही टीम नवा इतिहास रचण्यासाठी मैदानात उतरतीये. कोण कुणाला फॉलो करत नाही. मँचेस्टर कसोटीत आमचा निभाव लागणार नाही, असे अनेकांना वाटले. सामना अनिर्णित राखून टीम इंडियाने आम्ही काय करू शकतो, ते दाखवून दिले, असे गंभीर म्हणाले.
फॉलोऑन मिळाल्यावर नेपीयर टेस्ट ड्रॉ करण्यात उचलली होती प्रमुख भूमिका
२७ मार्च ते ३१ मार्च, २००९ या कालावधीत न्यूझीलंड येथील नेपीयरमध्ये रंगलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमान संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना रॉस टेलर १५१ (२०४), जेसी रायडर २०१ (३२८) , जेम्स फ्रँकलीन ५२ (१२२) आणि ब्रँडन मॅक्युलमन ११५ (१४०) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर ९ बाद ६१९ धावांवर डाव घोषीत केला होता. पहिला डाव ३०५ धावांत आटोपल्यामुळे त्यावेळी टीम इंडियावर फॉलोऑनची नामुष्की ओढावली. दुसऱ्या डावात राहुल द्रविड ६२ (२२०) सचिन तेंडुलकर ६४ (१३१), युवराज सिंग ५४(६३)* चौघांच्या अर्धशतकासह सलामीवीर गौतम गंभीर १३७ (४३६) आणि व्हीव्हीएस लक्ष्मण १२४ (२१२)* यांच्या शतकाच्या जोरावर भारतीय संघाने फॉलोऑन मिळालेला सामना अनिर्णित राखला होता.
तुम्ही या माणसाला काही म्हणा, पण तो 'मी' पेक्षा 'आम्ही'वर जोर देणारा हे मान्य करावेच लागेल
२००७ चा पहिला वहिला टी-२० वर्ल्ड कप आणि २०११ मध्ये वनडे वर्ल्डकप स्पर्धा जिंकून देण्यातही गौतम गंभीरची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली होती. २००७ च्या टी-२० वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये गंभीरनं ७५ धावांची खेळी केली होती. एवढेच नाही तर २०११ च्या वनडे वर्ल्ड कप फायनलमध्येही त्याने ९७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. पण या दोन्ही वेळी सर्वाधिक श्रेय मिळालं ते MS धोनीला. क्रिकेटमधील कोणताही सामना जिंकण्यात एका खेळाडूचा नाही तर संघातील प्रत्येक सदस्याचा वाटा असतो, असे म्हणत गंभीरनं एका व्यक्तीला श्रेय देण्यावरून अनेकदा धोनीवरही निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले आहे. इंग्लंड दौऱ्यातील अशक्यप्राय वाटणारा सामना अनिर्णित राखल्यावर ज्यावेळी त्याला त्याच्या इनिंगचा दाखला देण्यात आला त्यावेळीही त्यांनी मी काय केल त्यापेक्षा टीम इंडियानं आता काय केलं ते महत्त्वाचं आहे, यावर भर देणं पसंत केले.
Web Title: IND vs ENG Gautam Gambhir Says Team India Players To Make Their Own History Rather Than Following Anyone From The Past Including India Head Coach Himself
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.