Join us

कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली

युवा कॅप्टन शुबमन गिलला मिळाली केएल राहुल अन् जड्डू या अनुभवी खेळाडूंची साथ; अन् टीम इंडियानं इतिहास रचला

By सुशांत जाधव | Updated: August 3, 2025 10:18 IST

Open in App

Shubman Gill KL Rahul Ravindra Jadeja Team India Trio Set Record Against England : इंग्लंड दौऱ्यासह भारतीय कसोटी संघाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली. कॅप्टन्सीची जबाबदारी खांद्यावर पडल्यावर शुबमन गिलनं इंग्लंडच्या मैदानात  ७५० पेक्षा अधिक धावा काढत अनेक विक्रम मोडीत काढले. एवढेच नाही तर अनुभवी केएल राहुल आणि रवींद्र जडेजानंही नव्या कॅप्टनला सर्वोत्तम साथ देत दौरा गाजवला.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

असं पहिल्यांदाच घडलं

भारत-इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी अंतर्गत कसोटी मालिकेत टीम इंडियातील तिघांनी मिळून कुणाच्या स्वप्नातही आली नसेल ती गोष्ट सत्यात उतरवली.  सलामीवीर लोकेश राहुल, कर्णधार शुबमन गिल आणि रवींद्र जडेजा या तिघांनी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ५०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. एखाद्या कसोटी मालिकेत टीम इंडियाच्या ताफ्यातून तिघांनी ५०० प्लस धावा करण्याची ही पहिलीच वेळ ठरली. एक नजर कसोटी क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासात टीम इंडियानं पहिल्यांदाच करून दाखवलेल्या खास कामगिरीवर.... VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

'सेनापती' शुबमन गिल सर्वात आघाडीवर

कॅप्टन्सीची जबाबदारी खांद्यावर पडल्यावर शुबमन गिलनं इंग्लंड दौऱ्यावर फलंदाजीत खास धमक दाखवली. गिलनं इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत ५ सामन्यांतील १० डावात ४ शतकासह ७५४ धावा केल्या. २६९ ही त्याची या मालिकेतील सर्वोच्च धावसंख्या राहिली. एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा तो दुसरा भारतीय आहे. लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी १९७०-७१ च्या वेस्ट इंडिज दौऱ्यात ४ सामन्यातील ८ डावात ७७४ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.

केएल राहुलनंही दाखवला क्लास

केएल राहुल हा प्रतिभावंत क्रिकेटर आहे. पण इंग्लंड दौऱ्यापर्यंत त्याचे संघातील स्थानच काय तर प्लेइंग इलेव्हमध्ये खेळवल्यावर तो नेमका कोणत्या क्रमांकावर खेळणार हे अनिश्चित असायचे. रोहित शर्मानं कसोटीतून निवृत्ती घेतली अन् अनुभवी केएल राहुलवर भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करण्याची प्रमुख जबाबदारी मिळाली. पर्मनंट जॉबची खात्री मिळाल्यावर केएल राहुलनंही क्लास दाखवला. इंग्लंड दौऱ्यात केएल राहुलनं ५ सामन्यांतील १० डावात मालिकेत ५३२ धावांची खेळी करून मिळालेल्या संधीच सोनं करून दाखवलं. त्याने ५३.२० च्या सरासरीसह ४९.९० च्या स्ट्राइक रेटनं २ शतके अन् २ अर्धशतकाच्या मदतीने ५३२ धावा कुटल्या.

जड्डूच्या भात्यातून एक शतक अन् ५ अर्धशतके

परदेशात बॅटिंगसह बॉलिंगमध्ये खास छाप सोडण्यात अपयशी ठरलेल्या रवींद्र जडेजाने इंग्लंड दौऱ्यावर फलंदाजीत खास नजराणा पेश केला. त्याने  ५ सामन्यातील १० डावात १ शतक आणि ५ अर्धशतकाच्या मदतीने ८६ च्या सरासरीसह ५५.०६ च्या स्ट्राइक रेटनं ५१६ धावा केल्या.

तिघांच्या नावे एका मालिकेत ७०० धावांचा पराक्रम; कोहलीनं ३ वेळा साधलाय ६०० +चा डाव

आतापर्यंतच्या इतिहासात भारतीय संघाकडून ३३ वेळा एखाद्या फलंदाजाने कसोटी मालिकेत ५०० धावांचा टप्पा गाठला आहे. यात गावसकरांनी दोन वेळा ७०० पेक्षा अधिक धावा करण्याचा डाव साधला असून शुबमन गिलसह यशस्वी जैस्वालनं प्रत्येकी एकदा ७०० पेक्षा धावा केल्या आहेत.  एका कसोटी मालिकेत ६ वेळा भारतीय फलंदाजाकडून ६०० पेक्षा अधिक धावा केल्याचा रेकॉर्ड असून यात कोहलीनं तीन वेळा तर द्रविडनं दोन वेळा ही कामगिरी करून दाखवली आहे.

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडशुभमन गिलरवींद्र जडेजालोकेश राहुलभारतीय क्रिकेट संघ