IND vs ENG 5th Test Shubman Gill Run Out : भारत-इंग्लंड यांच्यातील पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात पहिल्यांदा फलंदाजीला उतरलेल्या टीम इंडियाचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात तंबूत परतले. अधून मधून सुरु असलेल्या पावसाच्या बॅटिंगमुळे खेळातील व्यत्यय निर्माण झाला असताना साई सुदर्शन आणि संघाचा कर्णधार शुबमन गिल ही जोडी जमलेली. पण IPL मध्ये सुपरहिट ठरलेली ही जोडी अर्धशतकी भागीदारीकडे वाटचाल करत असताना फुटली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सेट झाल्यावर शुबमन गिलनं रन आउटच्या रुपात फेकली विकेट
दोघांच्यातील ताळमेळाचा अभावामुळे टीम इंडियाला मोठा फटका बसला. गस ॲटकिन्सन (Gus Atkinson) याने शुबमन गिलकडून झालेल्या चुक संघाच्या फायद्यात रुपांतरीत करत टीम इंडियाला तिसरा धक्का दिला. भारतीय संघाच्या कर्णधाराला ३५ चेंडूत ४ चौकाराच्या मदतीने २१ धावा करून तंबूचा रस्ता धरावा लागला.
नेमकं काय घडलं?
पाचव्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाच्या खेळात लंचआधीच भारतीय संघाने ३८ धावांवर दोन्ही सलामीवीरांच्या विकेट गमावल्या होत्या. पावसामुळे निर्धारित वेळेआधी लंच ब्रेक घेण्यात आला. त्यानंतर खेळाला सुरुवात झाल्यावर शुबमन गिल आणि साई सुदर्शन या जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी उत्तम भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. ही जोडी सेट झालीये असे वाटत असताना २७ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर शुबमन गिलकडून मोठी चूक झाली. गस ॲटकिन्सन (Gus Atkinson) याच्या षटकातील दुसरा चेंडू हलक्या हाताने खेळल्यावर गिल चोरटी धाव घेण्यासाठी धावला. चेंडू गोलंदाजाने फिल्ड केला त्यावेळी गिल अर्ध्या क्रिजवर पोहचला होता. निर्णय चुकलाय हे लक्षात आल्यावर तो मागे फिरला. पण इंग्लंडच्या गोलंदाजाने फॉलो थ्रोमध्ये चेंडू पकडल्यावर थेट स्टंप टिपत टीम इंडियाला तिसरा धक्का दिला. गिल आपल्या निर्णयावर हताश झाल्याचे दिसून आले. ही चूक टीम इंडियाला चांगलीच महागात पडू शकते.
पंतच्या रन आउटमुळे फिरला होता सामना, तीच चूक आता गिलनं केली
लॉर्ड्स कसोटी सामन्यातील पहिल्या डावात लोकेश राहुलला शतकी पूर्ण करण्यासाठी स्ट्राइक देण्याच्या नादात रिषभ पंतने चोरटी धाव घेण्याच्या नादात विकेट फेकली होती. ही जोडी फुटल्यावर मजबूत स्थितीत असलेल्या टीम इंडिया पुन्हा बॅकफूटवर गेली. एवढेच नाही तर रनआउटची ही विकेट लॉर्ड्सच्या मैदानातील सामन्याला कलाटणी देणारी ठरली होती. खुद्द शुबमन गिलनं हा मॅचचा टर्निंग पॉइंट असल्याचे म्हटले होते. आता त्याच्याकडून अशी चूक झालीये.