Join us

IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!

चौथा दिवस कोण गाजवणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 00:37 IST

Open in App

IND vs ENG 3rd Test Day 3 Stumps : भारत-इंग्लंड यांच्यात अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीसाठी सुरु असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना रंगतदार अवस्थेत पोहचला आहे. २०१५ नंतर आणि क्रिकेटच्या पंढरीत पहिल्यांदाच पहिल्या डावात दोन्ही संघांनी समान धावसंख्या केली. त्यामुळे पहिल्या डावानंतर नो आघाडी नो पिछाडी.. असे चित्र पाहायला मिळाले. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडच्या संघाला पहिल्या डावात ३८७ धावांवर रोखल्यावर भारतीय संघाचा पहिला डावही ३८७ धावांत आटोपला. तिसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडच्या संघाने दुसऱ्या डावात एका षटकाच्या खेळात बिन बाद २ धावा केल्या होत्या.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

KL राहुलचं शतक अन् पंतची फिफ्टी

तिसऱ्या दिवसाच्या खेळात लोकेश राहुल आणि रिषभ पंत या जोडीनं ३ बाद १५४ धावांवरून खेळाला सुरुवात केली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १४१ धावांची खेळी केली. उपहाराआधी रिषभ पंतच्या रुपात टीम इंडियाला धावबादच्या रुपात चौथा धक्का बसला. तो १३१ चेंडूत ७४ धावा करून बाद झाला. लोकेश राहुलनं आपल्या कसोटी कारकिर्दीतील १० वे शतक झळकावले. पण त्यानंतर लगेच तो शोएब बशीरच्या जाळ्यात अडकला. 

IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)

जड्डूचं दमदार अर्धशतक, नितीश कुमार रेड्डीसह वॉशिंग्टन सुंदरची उपयुक्त खेळी

अर्धा संघ तंबूत परतल्यावर रवींद्र जडेजानं सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने नितिश कुमार रेड्डीच्या साथीनं सहाव्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी रचली. नितीश कुमार रेड्डी ९१ चेंडूत ३० धावा करून तंबूत परतला. मग जड्डूनं वॉशिंग्टन सुंदरच्या साथीनं सातव्या विकेटसाठी उपयुक्त अर्धशतकी भागीदारी केली. क्रिस वोक्सनं ७२ धावांवर जडेजाला तंबूचा रस्ता दाखवला. ब्रायडन कार्सनं आकाशदीपला ७ धावांवर चालते केल्यावर जोफ्रा आर्चरनं वॉशिंग्टन सुंदरला आपल्या जाळ्यात अडकवले. या अष्टपैलू खेळाडूनं २३ धावांची उपयुक्त खेळी केली अन् टीम इंडियानं पहिल्या डावात ३८७ धावांपर्यंत मजल मारत इंग्लंडच्या धावसंख्येची बरोबरी साधली.

चौथा दिवस कोण गाजवणार?

लॉर्ड्सच्या कसोटी सामन्यात पहिल्या डावानंतर भारत-इंग्लंड दोन्ही संघ बरोबरीत आहेत. उर्वरित दोन दिवसांच्या खेळातील चौथ्या दिवसाचा खेळ महत्त्वपूर्ण असेल. भारतीय संघाला बुमराहसह इतर गोलंदाजांकडून मोठ्या अपेक्षा असतील. जर हा सामना जिंकायचा असेल तर चौथ्या दिवसातील पहिल्या सत्रात टीम इंडियांच्या गोलंदाजांना धमक दाखवून द्यावी लागेल. चौथ्या दिवसात जो संघ आघाडी घेईल त्याला सामना जिंकण्याची अधिक संधी असेल. 

 

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडशुभमन गिलबेन स्टोक्सभारतीय क्रिकेट संघजसप्रित बुमराहरवींद्र जडेजालोकेश राहुलरिषभ पंत