हिटमॅन रोहित शर्माच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाच्या मालिका विजयाचा खंडीत झालेला विजयी सिलसिला पुन्हा एकदा सुरु झाला आहे. इंग्लंड विरुद्धचा दुसरा सामना जिंकत भारतीय संघानं ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खिशात घातली आहे. जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लंडच्या संघानं पहिल्यांदा फलंदाजी करताना ३०४ धावा करत भारतीय संघासमोर ३०५ धावांचे टार्गेट सेट केले होते. खराब फॉर्ममध्ये असलेल्या रोहित शर्मानं फ्लॉप शोची 'कटकट' संपवत साजरे केलेल दमदार शतक आणि शुबमन गिलच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघानं ४५ व्या षटकातच सामना जिंकला. नागपूरच्या मैदानात चौकार मारून संघाचा विजय निश्चित करणाऱ्या जड्डूनंच या सामन्यातही चौकार मारत मॅच संपवली. कमालीचा योगायोग हा की, हा सामनाही भारतीय संघानं ४ विकेट राखून जिंकला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
इंग्लंडकडून दोघांची फिफ्टी, भारताकडून जड्डूनं घेतल्या सर्वाधिक विकेट्स
इंग्लंडच्या संघाचा कर्णधार जोस बटलरनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सॉल्ट आणि बेन डकेट यांनी इंग्लंडच्या डावाला दमदार सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी रचली. सॉल्ट २६ धावांवर माघारी फिरल्यावर बेन डकेटनं अर्धशतक झळकावले. त्याने ५६ चेंडूत १० चौकाराच्या मदतीने ६५ धावांची खेळी केली. त्यानंतर जो रुटच्या भात्यातून ७२ चेंडूत ६ चौकाराच्या मदतीने ६९ धावा आल्या. ही इंग्लंडच्या ताफ्यातील फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या ठरली. हॅरी ब्रूक ३१ (५२), कर्णधार जोस बटलर ३४ (३५) आणि लायम लिविंगस्टोन याने ३२ चेंडूत केलेल्या ४१ धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडच्या संघानं ३०० धावांचा पल्ला पार केला. पण जड्डूच्या फिरकीमुळे संघावर ऑलआउटची नामुष्की ओढावली. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय मोहम्मद शमी, हर्षित राणा, हार्दिक पांड्या आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
कॅप्टन-उप कॅप्टन जोडी जमली, रोहित-गिलची शतकी भागीदारी
इंग्लंडच्या संघानं सेट केलेल्या ३०५ धावांच्या टार्गेटचा पाठलाग करताना भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि उप कर्णधार शुबमन गिल यांची जोडी जमली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत इंग्लंडच्या गोलंदाजांचे खांदे पाडले. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १३६ धावांची भागीदारी रचली. शुबमन गिलनं ५२ चेंडूत ९ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६० धावा करून बाद झाला. त्याने इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत बॅक टू बॅक दुसरे अर्धशतक झळकावले.
विराट अपयशी, रोहित-अय्यर यांच्यात ७० धावांची भागीदारी
शुबमन गिलची जागा घेण्यासाठी आलेल्या विराट कोहलीकडून दमदार कामगरीची अपेक्षा होती. पण तो दुहेरी आकडाही गाठू शकला नाही. ८ चेंडूचा सामना करून ५ धावांवर तो चालता झाला. त्यानंतर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी रचली. शतकी खेळीनंतर रोहित शर्मा ९० चेंडूत १२ चौकार आणि ७ षटकार मारून ११९ धावांवर बाद झाला.
जड्डूनं चौकार मारत संपवली मॅच
श्रेयस अय्यरनं ४७ चेंडूत ४४ धावा केल्या, अक्षर पटेलसोबतचा ताळमेळ ढासळल्यामुळे तो रन आउट झाला. केएल राहुल १० (१४) आणि हार्दिक पांड्या १०(६) यांनी दुहेरी आकडा गाठून मैदानात सोडल्यावर रवींद्र जडेजा मैदानात आला. अक्षर पटेलसोबत त्याने मॅच संपवली. अक्षर पटेलनं ४३ चेंडूत ४ चौकाराच्या मदतीने ४१ धावांची नाबाद खेळी केली. दुसरीकडे जडेजा ७ चेंडूत ११ धावा केल्या. विजयी चौकार जड्डूच्या भात्यातून निघाला. त्याने चौकार मारत मॅच संपवली,