भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेला पहिला कसोटी सामना रंगतदार अवस्थेत पोहोचला आहे. तीन दिवसांच्या खेळानंतर दोन्ही संघांचं पारडं जवळपास समसमान असून, आता शेवटच्या दोन दिवसांतील खेळ हा निर्णायक ठरणार आहे. तिसऱ्या दिवसअखेर भारताने २ बाद ९० धावा केल्या असून भारताकडे आता एकूण ९६ धावांची आघाडी आहे. अशा परिस्थितीत आता हा कसोटी सामना जिंकण्यासाठी भारताला इंग्लंडसमोर किती धावांचं आव्हान उभं करावं लागेल, याबाबत वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत.
लीड्सच्या हेडिंग्ले मैदानात सुरू असलेल्या या कसोटीच्या चौथ्या डावामध्ये धावांचा पाठलाग करण्याठी यजमान इंग्लंडला फलंदाजी करावी लागणार आहे. शेवटच्या डावात फलंदाजी करणं इंग्लंडसाठी तेवढंसं सोपं नसेल. या मैदानावरील मागच्या दहा वर्षांचा रेकॉर्ड पाहिल्यास येथे केवळ दोन वेळा ३०० हून अधिक धावांच्या लक्ष्याचा संघांना यशस्वी पाठलाग करता आला आहे. त्यामुळे भारताने आज आपली आघाडी जर तीनशेपार नेली तर भारताच्या विजयाची शक्यता ही ८५ ते ९० टक्क्यांपर्यंत वाढेल. तसेच या मैदानावर धावांचा सर्वोच्च पाठलाग करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. सुमारे ७७ वर्षांपूर्वी १९४८ साली ऑस्ट्रेलियाने या मैदानावर इंग्लंडने दिलेल्या ४०४ धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला होता. तसेच ७ विकेट्स राखून विजय मिळवला होता.
दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आपला विजय निश्चित करण्यासाठी भारतीय संघाला दुसऱ्या डावात फलंदाजीमध्ये सातत्य राखावं लागणार आहे. भारताने जर इंग्लंडसमोर ३४० ते ३५० धावांचं आव्हान उभं केलं, तर भारताचा विजय जवळपास निश्चित होईल. मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि जसप्रीत बुमराह यांच्या गोलंदाजीसमोर ३४० हून अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणं इंग्लंडसाठी आव्हानात्मक ठरेल.
भारताचा लिड्सच्या मैदानावरील रेकॉर्ड पाहिल्यास भारतीय संघ येथे आतापर्यंत सात कसोटी सामने खेळला आहे. त्यातील केवळ दोन सामन्यात भारताला विजय मिळाला आहे. तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. उर्वरित चार सामने भारताला गमवावे लागले आहेत. १९८६ मध्ये कपिल देव आणि २००२ मध्ये सौरव गांगुली हे दोनच भारतीय कर्णधार येथे कसोटी सामना जिंकण्यात यशस्वी ठरले आहेत.
Web Title: IND Vs ENG, 1st Test: India's victory is certain if England are challenged with this many runs in the first Test, the equation is this
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.