Abhishek Sharma on Mohammad Shami, Ind vs Eng 1st T20 : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात भारतीय संघाने उल्लेखनीय कामगिरी करत सहज विजय मिळवला. प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या भारतीय संघाने इंग्लंडला २० षटकात केवळ १३२ धावांवरच बाद केले. भारताकडून वरून चक्रवर्तीने तीन तर अर्षदीप सिंग आणि अक्षर पटेल यांनी दोन-दोन बळी घेत इंग्लंडचे कंबरडे मोडले. त्यानंतर १३३ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना डावखुरा सलामीवीर अभिषेक शर्मा याने ३४ चेंडू ७९ धावा करत संघाला सहज सोपा विजय मिळवून दिला. या सामन्यातून भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल, अशी चर्चा होती. पण त्याला प्लेइंग ११ मध्ये समाविष्ट करण्यात आले नाही. यामागे नेमके काय कारण आहे, याबाबत अभिषेक शर्माने सामन्यानंतर उत्तर दिले.
मोहम्मद शमी हा तब्बल १४ महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत होता. फिटनेसच्या कारणामुळे त्याला ऑस्ट्रेलियामधील कसोटी मालिकेसाठी पाठवणे शक्य झाले नव्हते. पण भारतात होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेतून तो पुनरागमन करणार हे जवळपास निश्चित होते. त्याला बुमराहच्या उपस्थितीत संघात नक्कीच स्थान मिळेल, असेही मानले जात होते. परंतु टॉसच्या दरम्यान सूर्यकुमार यादवने सांगितलेल्या खेळाडूंमध्ये मोहम्मद शमीला संधी देण्यात आली नाही. त्यावरून बरेच तर्कवितर्क लढवले गेले. त्याच्या फिटनेस वरून अनेक जणांनी प्रश्न उपस्थित केले. या सर्व प्रकारच्या गोष्टींना अभिषेक शर्माच्या उत्तराने पूर्णविराम मिळाला. सामना संपल्यानंतर बोलताना अभिषेक म्हणाला, "हा आमच्या संघ व्यवस्थापनाचा निर्णय आहे. कोलकताची खेळपट्टी पाहता कदाचित त्यांना हाच पर्याय योग्य वाटला असेल."
दरम्यान, पहिल्या टी२० सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय कर्णधाराचा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. सुरुवातीपासूनच अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या खेळाडूंना फारशी फटकेबाजी करू दिली नाही. दीडशेपार सहज धावसंख्या होऊ शकणाऱ्या ईडन गार्डनच्या पीचवर इंग्लंडच्या फलंदाजांची भंबेरी उडाली. कर्णधार जॉस बटलर याने ४४ चेंडूत ६८ धावांची संघर्षमय खेळी केली. परंतु त्याला दुसऱ्या बाजूने कोणाही फलंदाजाची साथ मिळाली नाही. बटलर नंतर सर्वोत्तम खेळी करणारा फलंदाज हॅरी ब्रूक हा केवळ १७ धावा करु शकला. भारताकडून वरून चक्रवर्तीने सर्वाधिक तीन बळी घेतले. १३३ धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने दमदार सुरुवात केली. अभिषेक शर्माने ३४ चेंडूत ७९ धावा करून भारतीय संघाचा विजयाचा मार्ग सोपा केला. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरच्या वेगवान माऱ्यामुळे भारतीय फलंदाजांना काहीशा अडचणी आल्या. पण अखेर तेराव्या षटकात तिलक वर्माच्या नाबाद १९ धावांच्या बळावर भारताने सहज विजय मिळवला.