Series Prediction Ind vs Eng 1st T20 : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची मालिका आजपासून सुरु होत आहे. दोन्ही संघांकडे असे खेळाडू आहेत जे आपल्या संघाला एकहाती विजय मिळवून देऊ शकतात. मात्र, भारतीय संघ घरच्या मैदानावर नेहमीच बलाढ्य मानला जातो. विशेषत: अलीकडच्या काळात भारतीय संघाने टी२० मध्ये चांगली कामगिरी केली आहे. याशिवाय, २०१४ पासून इंग्लंडचा संघ एकाही टी२० मालिकेत भारताला पराभूत करू शकलेला नाही. असे असताना दिग्गज क्रिकेटपटूने दावा केला आहे की, यावेळी इंग्लंडचा संघ भारताचा ३-२ ने पराभव करेल.
कुणी केली भविष्यवाणी?
इंग्लंड संघाने भारता विरुद्ध सलग चार टी२० मालिका गमावल्या आहेत. या दोन्ही संघांमधील शेवटचा सामना २०२४ च्या टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत झाला. या दरम्यान टीम इंडियाने बाजी मारली होती. आता जोस बटलर सर्व पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करणार आहे. कोलकाता येथे होणाऱ्या सामन्यापूर्वी इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकल वॉन याला चाहत्यांनी त्याची मालिकेबाबत भविष्यवाणी वर्तवण्यास सांगितले. त्यावेळी उत्तर देताना तो म्हणाला की, इंग्लंड संघ ३-२ ने जिंकेल. म्हणजेच भारताला ११ वर्षांनंतर पराभवाला सामोरे जावे लागणार आहे.
पहिल्या टी२० मध्ये पिच कसे असेल?
ईडन गार्डन्सच्या मैदानावर रंगणाऱ्या टी-२० सामन्यात सूर्यकुमार यादव आणि जोस बटलर दोन्ही कॅप्टन टॉस जिंकून 'दव' हा फॅक्टर (धुक्याचा प्रभाव) पाहता पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेण्याला पसंती देतील. जशी जशी मॅच पुढे सरकेल तस तसे गोलंदाजांना परिस्थितीत कठीण होईल. याशिवाय ईडन गार्डन्सची बाउंड्री छोटी असल्यामुळे फलंदाजांसाठी इथं चांगली संधी असेल.
या मैदानातील भारतीय संघाची टी-२० तील सर्वोच्च धावसंख्या
आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात ईडन गार्डन्सच्या मैदानात भारतीय संघाची सर्वोच्च धावसंख्या ५ बाद १८६ अशी राहिली आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडियाने ही कामगिरी नोंदवली होती. टॉस गमावल्यावर पहिल्यांदा बॅटिंग करताना भारतीय संघाने ही धावसंख्या उभारली होती. धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ ३ विकेट्सच्या मोबदल्यात १७८ धावांपर्यंतच पोहचू शकला होता.