पहिल्यांदाच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलनं बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात नाबाद शतकी खेळीसह दमदार सलामी दिलीये. बांगलादेशच्या संघानं सेट केलेल्या २२९ धावांचा पाठलाग करताना उप कॅप्टन आणि वनडेतील नंबर वनचा ताज मिरवणाऱ्या शुबमन गिलनं संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. स्लो पिचवर संयमी खेळी करणाऱ्या शुबमन गिलनं नव्वदीच्या घरात पोहचल्यावर बॅक टू बॅक षटकार मारत आपल्या भात्यातील उत्तुंग फटकेबाजीचा नजराणा पेश केला. त्यानंतर एकेरी धाव घेत त्याने वनडे कारकिर्दीतील आठव्या शतकाला गवसणी घातली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सलग चौथ्या सामन्यात फिफ्टी प्लस धावांची खेळी
गिल हा वनडे क्रिकेट फॉर्मेटमधील नवा प्रिन्स आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी वनडे रँकिंगमध्ये नंबर वनचा ताज मिरवत याने क्रिकेट जगतात या क्रिकेट प्रकारात धमाका करण्यास तयार असल्याचे संकेत दिले होते. मिनी वर्ल्ड कप स्पर्धेआधी इंग्लंड विरुद्धच्या घरच्या मैदानातील वनडे मालिकेतही त्याने लक्षवेधी खेळी केली होती. इंग्लंड विरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत त्याने अनुक्रमे ८७, ६० आणि ११२ धावा केल्या होत्या. त्यात आता आणखी एका शतकी खेळीची नोंद झाली आहे. मागील चार वनडे डावात त्याच्या भात्यातून दोन अर्धशतकासह बॅक टू बॅक दुसरे शतक पाहायला मिळाले आहे.
आधी कॅप्टन रोहित अन् मग केएल राहुलसोबत केली मॅच विनिंग पार्टनरशिप
बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात २५ वर्षीय युवा बॅटरनं कॅप्टन रोहित शर्माच्या साथीनं पहिल्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी रचली. भारतीय संघानं ठराविक अंतराने विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांच्या विकेट्स गमावल्यावर मॅचमध्ये ट्विस्ट येतोय, की काय? अस चित्र निर्माण झाले होते. पण गिल सेट झाला होता. त्याने केएल राहुलसोबत पाचव्या विकेटसाठी नाबाद ८७ धावांची भागीदारी रचत संघाला सहा विकेट्स आणि २१ चेंडू राखून विजय मिळवून दिला. गिलने १२९ चेंडूत १०१ धावा काढल्या. पाकिस्तान विरुद्धच्या लढतीआधी त्याच्या भात्यातून आलेली शतकी खेळी टीम इंडियासह सलामीवीरासाठी आत्मविश्वास उंचावणारी अशीच आहे.