Join us

Umesh Yadav, IND vs BAN 1st test: एकदम जबरदस्त! उमेश यादवने उडवला फलंदाजाचा त्रिफळा, स्टंपची कोलांटी उडी, Video एकदा पाहाच

कुलदीपचे ४ तर सिराजचे ३ बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 17:07 IST

Open in App

Umesh Yadav, IND vs BAN 1st test: वन डे मालिकेत अनपेक्षितरित्या पराभव पदरी पडल्यानंतर टीम इंडियाने कसोटी मालिकेची सुरूवात चांगली केली आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलने कर्णधारपद भूषवत संघाला चांगल्या स्थितीत आणून ठेवले आहे. आज दुसऱ्या दिवसअखेरीस बांगलादेशने ८ बाद १३३ धावा केल्या आहेत. त्याआधी भारताने चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर आणि रविचंद्रन अश्विन यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पहिल्या डावात ४०४ धावांपर्यंत मजल मारली. बांगलादेशच्या फलंदाजांना मात्र फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्यातही उमेश यादवने यासिर अलीचा उडवलेला त्रिफळा वाहवा मिळवून गेला.

भारतीय संघाकडून चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक ९० धावांची खेळी केली. त्याने यात ११ चौकार लगावले. त्याला शतक झळकावता आले नाही. श्रेयस अय्यरदेखील शतकाच्या नजीक पोहोचला, पण १० चौकारांसह ८६ धावांवर तो माघारी परतला. अश्विनच्या ५८, रिषभ पंतच्या ४६ आणि कुलदीप यादवच्या ४० धावांमुळे भारताला ४०० पार आकडा गाठता आला. ४०४ धावांच्या आव्हानाचे लक्ष्य घेऊन मैदानात आलेल्या बांगलादेशचा सलामीवीर नजमुलला शून्यावर माघारी पाठवले. त्यानंतर उमेश यादवने कमाल केली. यासिर अलीला एक आखूड टप्प्याचा चेंडू टाकल्यानंतर फलंदाजाचा अंदाज चुकला. चेंडू वेगाने बॅटवर लागला आणि त्यानंतर तो क्लीन बोल्ड झाला. चेंडू इतका वेगवान होता की चेंडू स्टंपवर आदळला नि स्टंप अक्षरश: कोलांटी उडी मारत लांब जाऊन पडला. पाहा तो व्हिडीओ-

दरम्यान, २ बाद ५ अशी धावसंख्या झाल्यानंतर बांगलादेशची फलंदाजी कोलमडली. झाकीस हसन २० धावांवर, लिटन दास २४ धावांवर, मुश्फीकूर रहीम २८ धावांवर, शाकीब अल हसन ३ धावांवर, नुरूल हसन १६ धावांवर तर ताजीउल इस्लाम शून्यावर बाद झाला. वन डे मालिकेत भारतासाठी डोकेदुखी ठरलेला मेहिदी हसन मिराज सध्या मैदानावर १६ धावांवर खेळतोय तर एबादत हुसेन १३ धावांवर नाबाद आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशभारतबांगलादेश
Open in App