Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs BAN 1st T20 : हिंदू महासभेची ग्वाल्हेरमध्ये बंदची घोषणा! बांगलादेशसोबत क्रिकेट खेळण्याला विरोध

सध्या बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर असून कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 14:18 IST

Open in App

सध्या बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर असून कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. यानंतर तीन सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळवली जाईल. सहा ऑक्टोबरपासून या मालिकेला सुरुवात होईल. पहिला सामना ग्वाल्हेरमध्ये होणार असून, या सामन्यावरुन वाद होण्याची शक्यता आहे. पहिल्या सामन्याच्या दिवशी हिंदू महासभेने ग्वाल्हेरमध्ये बंदची हाक दिली आहे. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ त्यांनी या बंदची हाक दिली. महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जयवीर भारद्वाज म्हणाले की, बांगलादेशात अजूनही हिंदूंवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे सध्या या देशासोबत क्रिकेट खेळण्याची योग्य वेळ नाही. अशा परिस्थितीत हिंदू महासभेने सामन्याच्या दिवशी ग्वाल्हेर बंदची हाक दिली आहे.  

खरे तर माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी पद सोडण्यापूर्वीपासूनच बांगलादेशात अशांतता माजली आहे. याच कारणामुळे हसीना पंतप्रधानपद सोडून भारतात आल्या. तेव्हापासून बांगलादेशात अल्पसंख्याकांना लक्ष्य केले जात आहे. अनेक ठिकाणी हिंदूंवर हल्ले झाले आहेत. तसेच तिरुपती बालाजी मंदिरातील लाडूंमध्ये भेसळ करणाऱ्या दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी भारद्वाज यांनी केली. ते म्हणाले की, अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेकवेळी देखील हे लाडू वाटण्यात आले होते. लाडूंच्या भेसळीमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत.

दरम्यान, कानपूरमध्ये होणाऱ्या कसोटी सामन्यादरम्यान आंदोलन करण्याचा इशाराही हिंदू महासभेने दिला होता. मात्र, चेन्नईतील पहिला कसोटी सामना कोणत्याही अडचणीशिवाय पार पडला. यामध्ये भारताने २८० धावांनी विजय मिळवत दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसरी कसोटी २७ सप्टेंबरपासून खेळवली जाणार आहे. यानंतर तीन सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका होणार आहे. ग्वाल्हेरमधील पहिल्या सामन्यानंतर शेवटचे दोन ट्वेंटी-२० सामने ९ ऑक्टोबरला दिल्ली आणि १२ ऑक्टोबरला हैदराबादमध्ये होतील.

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशटी-20 क्रिकेटहिंदू