भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लवकरच सुरू होणाऱ्या रोमांचक एकदिवसीय क्रिकेट मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियातून एक मोठी बातमी येत आहे. कांगारुंच्या संघाला एक मोठा धक्का बसला आहे. संघाचे प्रमुख फिरकीपटू ॲडम झम्पा आणि यष्टिरक्षक-फलंदाज जोश इंग्लिस हे दोघेही भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळू शकणार नाहीत.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ही माहिती दिली आहे. या दोन महत्त्वाच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे संघात मोठे बदल करावे लागणार आहेत. झम्पा हा आक्रमक ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचा महत्त्वाचा भाग आहे, तर इंग्लिस मधल्या फळीत फलंदाजीसाठी उपयुक्त आहे.
बदली खेळाडूंची निवड
ॲडम झम्पा आणि जोश इंग्लिस यांच्या जागी दोन युवा खेळाडूंची संघात निवड करण्यात आली आहे. झम्पाच्या जागी डावखुरा फिरकीपटू मॅथ्यू कुहनेमनला संधी देण्यात आली आहे. तर इंग्लिसच्या जागी यष्टिरक्षक-फलंदाज जोश फिलिपचा समावेश करण्यात आला आहे.
दोन महत्वाचे खेळाडू बाहेर बसल्याने त्याचा फटका ऑस्ट्रेलियन संघाला बसणार आहे. पहिल्याच सामन्यापासून ऑस्ट्रेलियावर वचक ठेवण्याची भारताला मोठी संधी चालून आली आहे.