महिला T20 विश्वचषक २०२३ चा उपांत्य फेरीचा पहिला सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात केपटाऊन येथे खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. तसंच निर्धारित २० षटकांत ४ गडी गमावून ऑस्ट्रेलियाच्या संघानं १७२ धावा केल्या. अतिम फेरीच्या प्रवेशासाठी भारतीय संघासमोर १७३ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. जेमिमा रॉड्रिक्स आणि हरमनप्रीत कौरच्या धडाकेबाज फलंदाजीनंतर भारतीय संघ विजयाच्या दिशेनं जात असल्याचं दिसून येत होतं. परंतु दोघी बाद झाल्यानंतरभारतीय संघाचा डाव गडगडला. दरम्यान, भारतीय संघाचा ५ धावांनी पराभव करत ऑस्ट्रेलियाच्या संघानं अंतिम सामन्यात धडक मारली.
मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाला सुरुवातीलाच शेफालीच्या रूपाने पहिला धक्का बसला. यानंतर उपकर्णधार स्मृती मानधनाही २ धावांवर बाद झाली. तर यास्तिका आपल्याच चुकीमुळे धावबाद झाली. जेमिमा रॉड्रिग्जने २४ चेंडूंचा सामना कर ६ चौकारांच्या मदतीनं ४३ धावांची शानदार खेळी केली. तर कर्णधार हरमनप्रीत कौरनंही तिला उत्तम साथ देत ६ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीनं ५२ धावा केल्या. ॲश्ले गार्डनरनं तिला धावबाद केलं. रिचा घोषनं १७ चेंडूंचा सामना करत १४ धावा केल्या, तर स्नेह राणानं १० चेंडूंचा सामना करत ११ धावा केल्या. दीप्ती शर्मानं अखेर झुंज देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तिनं १७ चेंडूंचा सामना करत २ चौकारांच्या मदतीनं २० नाबाद धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवातही चांगली झाली. संघाच्या सलामीवीर अलिसा हिली आणि बेथ मूनीने पहिल्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी केली. अलिसा हिलीच्या रुपाने ऑस्ट्रेलिया संघाला पहिला धक्का बसला. यानंतर मात्र मुनीने ३७ चेंडूत ५४ धावांची खेळी आणि लॅनिंगने ३४ चेंडूत ४९धावांची नाबाद खेळी केली. ऑस्ट्रेलिया संघाने निर्धारित २० षटकांत ४ बाद १७२ धावा केल्या. भारताकडून शिखा पांडेने दोन विकेट घेतल्या. दीप्ती शर्मा आणि राधा यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.