पर्थ कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी जसप्रीत बुमराहनं ट्रॅविस हेडची विकेट घेत भारतीय संघाच्या विजयातील मोठा अडथळा दूर केला. या विकेटच सेलिब्रेशनही बघण्याजोगे होते. विराट कोहलीचा यावेळी जसप्रीत बुमराहचा आक्रम अंदाजाची झलक पाहायला मिळाली. जसप्रीत बुमराह भल्या भल्या फलंदाजांची विकेट घेण्यात माहिर आहे. विकेट मिळवल्यावर तो खूप उत्साहित वैगेर होत नाही. पण हेडची विकेट घेतल्यावर त्याचा एक वेगळा अवतार पाहायला मिळाला.
विराटचं हे नेहमीचच, पण बुमराहचा पहिल्यांदाच दिसला असा अवतार
टीम इंडियाकडून विकेट्स कुणीही घेऊ देत विराट कोहलीचं आक्रमक अंदाजातील सेलिब्रेशन हे काही नवं नाही. पण जसप्रीत बुमराह विराट अंदाजात कधीच आनंद व्यक्त करत नाही. पण यावेळी त्याने मिले सूर मेरा तुम्हारा असं म्हणत कोहलीसोबत हेडच्या विकेटचा आनंद साजरा केल्याचे पाहायला मिळाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.
तो टीम इंडियाचा 'जानी दुश्मन'च
हेडची विकेट फक्त भारतीय खेळाडूंसाठीच नाही तर भारतीय चाहत्यांसाठीही मोठा दिलासा देणारी असते. ट्रॅविस हेडनं आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ फायनलसह वनडे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेत टीम इंडियाच्या गोलंदाजांना चांगलेच दमवलं होते. ही गोष्ट भारतीय चाहत्यांसह खेळाडूही विसरलेले नाहीत. हाच सीन पर्थच्या मैदानातील त्याच्या विकेटनंतर पाहायला मिळाला. पर्थच्या मैदानात कांगारुंच्या ताफ्यातील रथी महारथी थोडक्यात आटोपल्यावर हेड पुन्हा जोमात आला होता. पण बुमराहनं त्याचा खेळ खल्लास करत मॅचमध्ये ऑस्ट्रेलियासाठी काही चमत्कार होईल, याची संधीच संपुष्टात आणली.
बुमराहच्या या विकेटसह विजय आणखी सहज अन् सोपा झाला
ट्रॅविस हेडनं १०१ चेंडूत ८९ धावा केल्या. एका बाजूला ऑस्ट्रेलियातील अन्य फलंदाज भारतीय गोलंदाजीसमोर गडबडताना दिसले. दुसऱ्या बाजूला ट्रॅविस हेड अगदी आरामात खेळत होता. आधी त्याने स्टीव स्मिथ आणि त्यानंतर मिचेल मार्शच्या साथीनं त्याने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. सेट झालेल्या टीम इंडियाच्या 'जानी दुश्मन'ला कार्यवाहू कॅप्टन जसप्रीत बुमराहनं चालते केले आणि भारतीय संघाचा विजय आणखी सोपा झाला.