Shreyas Iyer Injury Admitted to ICU, IND vs AUS: भारतीय एकदिवसीय उपकर्णधार श्रेयस अय्यरला सिडनी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो सध्या अतिदक्षता विभागात (ICU) आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यादरम्यान झालेल्या बरगडीच्या दुखापतीमुळे त्याला अंतर्गत रक्तस्त्राव होत आहे. शनिवारी (२५ ऑक्टोबर) तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अय्यरने बॅकवर्ड पॉइंटवरून मागे धावत असलेल्या अॅलेक्स कॅरीचा शानदार कॅच घेतला. या घटनेदरम्यान त्याच्या डाव्या बरगडीला दुखापत झाली. तो ड्रेसिंग रूममध्ये परतला आणि त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले.
या प्रकरणाबाबत माहिती असलेल्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, श्रेयस गेल्या काही दिवसांपासून ICU मध्ये आहे. रिपोर्ट्स काढल्यानंतर, अंतर्गत रक्तस्त्राव आढळून आला आणि त्याला ताबडतोब दाखल करावे लागले. त्याची दुखापत कितपत गंभीर आहे त्यावर त्याला दोन ते सात दिवस निरीक्षणाखाली ठेवले जाईल, कारण रक्तस्त्रावापासून संसर्ग पसरू नये हे महत्वाचे होते.
अय्यरची दुखापत गंभीर
ड्रेसिंग रूममध्ये परतल्यानंतर, अय्यरच्या शरीराचे तापमान, नाडीचा वेग आणि रक्तदाबात चढ-उतार होत होते. त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानंतर, बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याला ताबडतोब रुग्णालयात नेले. एका सूत्राने सांगितले की, टीम डॉक्टर आणि फिजिओने कोणतीही जोखीम पत्करली नाही. त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. तो आता स्थिर आहे, परंतु हे प्राणघातक ठरू शकले असते. त्याची प्रकृती आता सुधारतेय. तो मजबूत आहे आणि लवकरच बरा होईल.
श्रेयस अय्यरचे पुनरागमन
श्रेयस अय्यर सुरुवातीला सुमारे तीन आठवडे खेळापासून दूर राहण्याची अपेक्षा होती, परंतु त्याला तंदुरूस्त होण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो. सूत्राने सांगितले की, अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यामुळे, त्याच्या क्रिकेट खेळण्यासाठी निश्चितपणे जास्त वेळ लागेल. सध्या स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतण्यासाठी निश्चित वेळ सांगणे कठीण आहे. भारतात परतण्यासाठी तंदुरुस्त घोषित होण्यापूर्वी किमान एक आठवडा सिडनी रुग्णालयात त्याला ठेवण्याची अपेक्षा आहे. अय्यर भारताच्या टी२० संघाचा भाग नसल्याने त्याला सिडनीत विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.