Join us

Mithali Raj, Women's World Cup, IND vs AUS: महिला क्रिकेटवर मितालीचंच 'राज'! दमदार अर्धशतकासह रचला नवा इतिहास

मितालीने यास्तिकाच्या साथीने केली १३० धावांची भागीदारी; ऑस्ट्रेलियाला दिलं २७८ धावांचं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 09:51 IST

Open in App

Mithali Raj, Women's World Cup, IND vs AUS: भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज ही गेले अनेक दिवस चर्चेत होती. तिचा खराब फॉर्म तिच्यासाठी चिंतेची बाब ठरत होती. वरच्या फळीतील स्मृती मानधना आणि मधल्या फळीतील हरमनप्रीत कौर यांनी चांगली फलंदाजी करत संघाला दोन विजय मिळवून दिले. परंतु भारताची खरी परिक्षा ऑस्ट्रेलियासमोर असताना अखेर मितालीला सूर गवसला. संघ वाईट स्थितीत असताना तिने संयमी खेळी करत डाव सावरला आणि दमदार अर्धशतक ठोकलं. मिताली, यास्तिका आणि हरमनप्रीत (५७) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने ७ बाद २७७ पर्यंत मजल मारली आणि ऑस्ट्रेलियाला २७८ धावांचं आव्हान दिलं. 

भरवशाची फलंदाज स्मृती मानधना (१०) आणि शफाली वर्मा (१२) स्वस्तात बाद झाली. त्यामुळे भारताची अवस्था २ बाद २८ अशी झाली होती. पण त्यानंतर यास्तिका भाटिया आणि मिताली राज जोडीने संघाला चांगली दिशा दिली. यास्तिका आणि मितालीने १३० धावांची भागीदारी केली. यास्तिका ५९ धावा करून बाद झाली. मितालीने मात्र फटकेबाजी सुरू ठेवली. मिताली राजने ४ चौकार आणि एक षटकार खेचत ६८ धावा केल्या. मितालीने कठीण प्रसंगी खेळपट्टीवर राज करत संघाला मोठ्या धावसंख्येची आशा पल्लवित करून दिली. महिला वन डे वर्ल्ड कपमध्ये मितालीचं हे १२वे अर्धशतक ठरलं. त्यासोबच या यादीत तिने संयुक्तपणे अव्वल स्थान पटकावलं.

मिताली राजने या आधीच्या चार सामन्यांमध्ये १, ५, ९ आणि ३१ धावांची खेळी केली होती. इंग्लंडविरूद्ध भारताचा डाव १३४ धावांतच आटोपला. त्यानंतर मितालीच्या खेळावर टीका झाली होती. सिनियर खेळाडूंनी जबाबदारीने खेळावं असं मिताली म्हणाली होती, त्यावरून तिलाच टीकाकारांनी आरसा दाखवला होता. पण आज मात्र मितालीने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत क्रिकेटवर अजूनही आपलंच 'राज' असल्याचं दाखवून दिलं.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामिताली राजभारतीय क्रिकेट संघस्मृती मानधना
Open in App