Join us

IND vs AUS : रिंकूने षटकार मारूनही ६ धावा का मिळाल्या नाहीत? वाचा अखेरच्या षटकाचा थरार

  IND vs AUS live Match : ऑस्ट्रेलियाला नमवून भारतीय संघाने विजयी सलामी दिली. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 23:44 IST

Open in App

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेत विजयी सलामी दिली. विशाखापट्टणम येथे गुरुवारी झालेल्या सामन्यात टीम इंडियाने दोन गडी आणि एक चेंडू राखून विजय मिळवला. भारताचा नवनिर्वाचित कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने निर्धारित २० षटकात तीन गडी गमावत २०८ धावा केल्या होत्या. टीम इंडियाने १९.५ षटकांत आठ गड्यांच्या मोबदल्यात २०९ धावा करत सामना जिंकला. खरं तर सामन्यातील शेवटचे षटक अतिशय रोमांचक होते. अखेरच्या षटकात भारताने तीन गडी गमावले आणि रिंकू सिंगने षटकार ठोकला पण त्याला सहा धावा मिळाल्याच नाहीत... भारताने १९ षटकांत ५ गडी गमावून २०२ धावा केल्या होत्या. टीम इंडियाला विजयासाठी शेवटच्या सहा चेंडूत सात धावा करायच्या होत्या.  

अखेरच्या षटकातील थरार

  1. १९. १ - रिंकू सिंगने चौकार ठोकला
  2. १९.२ - रिंकूने एक धाव काढली
  3. १९.३ - अक्षर पटेल बाद
  4. १९.४ - रवी बिश्नोई बाद 
  5. १९.५ - अर्शदीप सिंग धावबाद, एक धाव मिळाली 
  6. १९.५ - रिंकूचा षटकार पण शॉन ॲबॉटचा नो बॉल, भारताला एक धाव मिळाली

ऑस्ट्रेलियाने निर्धारित २० षटकांत ३ बाद २०८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात २०९ धावांचा पाठलाग करताना भारताने २ गडी राखून विजय साकारला. भारतीय सलामीवीर ऋतुराज गायकवाड (०) आणि यशस्वी जैस्वाल (२१) बाद झाल्यानंतर भारतीय कर्णधार 'सूर्या'चे आगमन झाले. त्याला इशान किशनने चांगली साथ दिली आणि ताबडतोब अर्धशतक झळकावले. किशनने ५ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने ५८ धावांची खेळी केली. सूर्यकुमारने १९०.४८च्या स्ट्राईक रेटने धावा करून भारताची विजयाकडे कूच केली. पण जेसन बेहरेनडॉर्फच्या गोलंदाजीवर अॅरॉन हार्डीने शानदार झेल घेऊन भारतीय कर्णधाराच्या खेळीचा अंत केला. सूर्याने ४२ चेंडूत ८० धावा केल्या, ज्यामध्ये ४ षटकार आणि ९ चौकारांचा समावेश राहिला. 

अखेरच्या षटकात नाट्यमय घडामोडी भारताला विजयासाठी अखेरच्या षटकात सात धावांची आवश्यकता होती. रिंकू सिंगने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकून विजयाकडे भारताची गाडी नेली. पण दुसऱ्या चेंडूवर एक धाव काढून त्याने अक्षर पटेलला फलंदाजीची संधी दिली. परंतु, मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात अक्षर बाद झाला. चौथ्या चेंडूवर रवी बिश्नोई बाद झाला तर त्याच्या पुढच्या चेंडूवर अर्शदीप सिंग धावबाद झाला. अखेरच्या चेंडूवर भारताला विजयासाठी एक धाव हवी होती. लक्षणीय बाब म्हणजे अखेरच्या चेंडूवर षटकार खेचून रिंकू सिंगने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. शेवटचा चेंडू नो बॉल असल्याने रिंकूला षटकार मारूनही सहा धावा मिळाल्या नाहीत.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारिंकू सिंगभारतीय क्रिकेट संघसूर्यकुमार अशोक यादव