IND vs AUS Jasprit Bumrah Strikes Again Send Back Steve Smith And Nathan McSweene: अॅडिलेड कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या खेळात पहिल्या तासाभराच्या खेळातच जसप्रीत बुमराहनं आपला जलवा दाखवून दिला. बॅटिंगसाठी अगदी सहज सुलभ परिस्थिती निर्माण झालेल्या खेळपट्टीवर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत जसप्रीत बुमराहनं आधी सेट झालेली जोडी फोडली. त्यानंतर त्याने स्टीव्ह स्मितचा चेहरा पाडला.
जसप्रीत बुमराहनं फोडली सेट झालेली जोडी
अॅडिलेड येथील ओव्हलच्या मैदानात दिवस रात्र खेळवण्यात येणाऱ्या कसोटी सामन्यातील पहिला दिवस ऑस्ट्रेलियानं गाजवला. नॅथन मॅकस्विनी आणि मार्नस लाबुशेन या जोडीनं १ बाद ८६ धावांवरून दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. ही जोडी कोण फोडणार? याचं मोठं टेन्शन टीम इंडियाला होतं. जसप्रीत बुमराहनं ही जोडी फोडत टीम इंडियाला टेन्शन फ्री केले. पहिल्या दिवसाच्या खेळात टीम इंडियाला पहिलं यश मिळवून देणाऱ्या जसप्रीत बुमराहनं सलामीवीर नॅथन मॅकस्विनी याला पंत करवी झेलबाद केले. तो १०९ चेंडूचा सामना करून ३९ धावांवर बाद झाला. मॅकस्विनी आणि लाबुशेन या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केली.
स्मिथ पुन्हा अपयशी! बुमराहनं दाखवला तंबूचा रस्ता
मॉडर्न क्रिकेटच्या जमान्यातील फोर फॅबमधील स्टार स्टीव्ह स्मिथ हा गेल्या काही सामन्यांपासून धावांसाठी संघर्ष करताना दिसतोय. जसप्रीत बुमराहनं त्याचा हा संघर्ष कायम ठेवत टीम इंडियाला तिसरं यश मिळवून दिले. स्टंप टू स्टंप गोलंदाजी करणाऱ्या जसप्रीत बुमराहाचा लेग स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या एका चेंडूवर स्मिथ फसला. स्निकोमध्ये बॅट किंवा पॅडला चेंडू लागलाय याचा कोणताही पुरावा दिसला नाही. पण स्मिथनं रिव्ह्यू वैगेरे न घेता पंतच्या हाती चेंडू गेल्यावरच मैदान सोडल्याचा सीन पाहायला मिळाला. त्याने ११ चेंडूत फक्त ११ धावा केल्या.
पर्थ कसोटी सामन्यानंतर पुन्हा एकदा बुमराह मदतीला धावला
जसप्रीत बुमराह हा कोणत्याही फॉर्मेटमध्ये सर्वोत्तम गोलंदाजी करण्यात माहिर आहे. पर्थ कसोटी सामन्यात त्याने दमदार कामगिरीसह भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. पिंक बॉलवरही तो संघाला यश मिळवून देण्यात यशस्वी ठरला. खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असताना त्याने दुसऱ्या दिवशी २ विकेट्स घेत आपल्या गोलंदाजीतील ताकद दाखवून दिलीये. भारतीय संघाला या सामन्यात कमबॅक करायचे असेल तर अन्य गोलंदाजांनीही त्याला साथ देणं गरजेचे आहे.