भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना अॅडिलेड येथील ओव्हलच्या मैदानात रंगला आहे. हा सामना ऑस्ट्रेलियन मैदानात खेळवण्यात येत असला तरी स्टेडियममध्ये भारतीय चाहत्यांनी एक खास माहोल निर्माण करुन लक्षवेधून घेतल्याचे दिसून आले. क्रिकेट अन् भारतीय चाहते यांच्यातील नाते किती खास आहे, याची झलक ओव्हल स्टेडियमबाहेर पाहायला मिळाली.
ऑस्ट्रलियात भारतीय चाहत्यांमध्ये दिसून आला कमालीची उत्साह
दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी विक्रमी उपस्थितीसह क्रिकेट चाहत्यांनी भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पिंक बॉल कसोटी सामना एकदम खास केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भारतीय चाहत्यांनी ढोल-ताशे या पारंपारिक वाद्यासह टीम इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियमबाहेर गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. ओव्हल स्टेडियमबाहेरील भारतीय चाहत्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात चाहते कमालीच्या उत्साहासह सामन्याचा आनंद घेण्यासाठी आल्याचे दिसून येते.
प्रेक्षकांच्या उपस्थितीचा विक्रम
भारत-ऑस्ट्रेलिया दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी शुक्रवारी अॅडिलेड येथे पहिल्या दिवशी एकूण ३६ हजार २२५ प्रेक्षकांनी उपस्थिती दर्शविली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेल्या माहितीनुसार, ही भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यातील आतापर्यंतची सर्वांत मोठी उपस्थिती ठरली असून, या विक्रमी प्रेक्षकसंख्येने २०११-१२ मधील ३५ हजार ०८१ प्रेक्षकसंख्येचा विक्रम मोडला. अॅडिलेड स्टेडियमची प्रेक्षक क्षमता ५३ हजार ५०० इतकी आहे.
दोनवेळा बत्ती गुल! मोबाइल टॉर्च लावत प्रेक्षकांनी उडवली आयोजकांची खिल्ली
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सुरू असलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी अखेरच्या सत्रात दोनवेळा प्रकाशझोत बंद पडण्याची घटना घडली. यामुळे काही वेळ खेळही थांबवण्यात आला. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीदरम्यान १८व्या षटकात दोनवेळा प्रकाशझोत बंद पडला. हर्षित राणाच्या या षटकातील दुसरा चेंडू टाकल्यानंतर लाइट गेली. काही मिनिटांत प्रकाशझोत पूर्ववत झाला खरा, मात्र पुन्हा चौथ्या चेंडूनंतर प्रकाशझोत बंद पडला. यावेळी प्रेक्षकांनीही मजा घेताना मोबाइल टॉर्च लावून आयोजकांची खिल्ली उडवली. या अडथळ्यामुळे पहिल्या दिवशी अतिरिक्त तीन मिनिटांचा खेळ रंगला.