Rishabh Pant, IND vs AUS 3rd Test Gabba: टीम इंडियाने रोहित शर्माच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील पहिली कसोटी जिंकली. पण दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन केले. दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाचा पहिला डाव १८० धावांत आटोपला. नंतर ट्रेव्हिस हेडच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३३७ धावा केल्या. दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजी १७५ धावांवर संपुष्टात आली. अखेर १९ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने दहा गडी राखून पूर्ण केले आणि मालिकेत १-१ बरोबरी साधली. आता तिसऱ्या कसोटीआधी भारतीय संघासाठी वाईट बातमी आली आहे. रिषभ पंतला दुखापत झाल्याने त्याच्या कसोटी सहभागाबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
रिषभ पंतने सराव थांबवला!
टीम इंडियाचे सर्व खेळाडू बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या कसोटीसाठी तयारी करत आहेत. यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतही या काळात फलंदाजीचा सराव करताना दिसला. मात्र, याच काळात ऋषभ पंत जखमी झाला. ब्रिस्बेनमधील गाबा येथे खेळल्या जाणाऱ्या कसोटीच्या तयारीत असताना पंतला दुखापत झाली. थ्रोडाऊन स्पेशालिस्ट रघू नेट्समध्ये ऋषभ पंतला गोलंदाजी करत होता. रघू पंतला साईडआर्मने (क्रिकेट उपकरणे) गोलंदाजी करून सरावात मदत करत होता. चेंडू थेट त्याच्या हेल्मेटला लागला आणि पंतला दुखापत झाली. ऋषभ पंतने दुखापत झाल्यानंतर फलंदाजीचा सराव थांबवला.
यानंतर, मेडिकल टीम, भारताचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप आणि सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट तेथे आले. त्यांनी पंतची तपासणी केली. पंतची दुखापत किरकोळ स्वरूपाची होती असे त्यांच्या तपासणीत निष्पन्न झाले. त्याबाबतची खात्री झाल्यावर पंत काही काळ विश्रांती घेत होता. पण काही वेळानंतर पंतने पुन्हा सराव सुरू केला.