Virat Kohli on Rohit Sharma, IND vs AUS 3rd ODI: ऑस्ट्रेलियाविरूद्ध आधीच २-०ने मालिका गमावलेल्या टीम इंडियाने तिसऱ्या सामन्यात ९ गडी राखून यजमानांचा पराभव केला. रोहित शर्माने नाबाद १२१ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. तर विराट कोहलीनेही नाबाद ७४ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. ऑस्ट्रेलियन मैदानावर विराट-रोहित जोडीचा आजचा शेवटचा सामना होता. त्यामुळे भारतासाठी हा विजय खूपच विशेष ठरला. या विजयानंतर विराट कोहलीरोहित शर्माबद्दल तोंडभरून बोलला.
"रोहितबरोबर फलंदाजी करणं मला खूप सोपं गेलं. आम्ही दोघांनी सामना जिंकवला याचा मला आनंद आहे. रोहित आणि मी खूप वर्षांपासून एकत्र खेळतोय. त्यामुळे आम्ही एकमेकांना नीट समजू शकतो. आम्हा दोघांनाही सुरुवातीपासूनच खेळाची उत्तम समज आहे. यशस्वी होण्यासाठी आपल्याला खेळ समजून घेणं जमलंच पाहिजे. सुरुवातीपाासूनच आम्ही एकत्र खेळून प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारली आहे," असे विराट म्हणाला.
"२०१३ मध्ये घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरूद्धच आमच्या पार्टनरशिपची सुरुवात झाली. आता सगळ्यांना माहितीये की, आम्ही २० षटके एकत्र खेळलो तर सामना भारताच्या बाजूने झुकणार. जेव्हा गोष्टी तुमच्या बाजूने घडत नाहीत, तेव्हा तुमच्यासमोर खूप आव्हानं उभी राहतात. पण अशी आव्हाने तुमच्याकडून सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करून घेतात आणि तुम्हाला यशस्वी करतात," असा अनुभव विराटने शेअर केला.
"मालिकेच्या सुरुवातीला दोनदा शून्यावर बाद झालो होतो. आज पहिली धाव घेतल्यावर खूप बरं वाटलं. इतके वर्ष खेळूनसुद्धा एक धाव काढणे किती कठीण असते, ते क्रिकेटने मला दाखवून दिलं. ऑस्ट्रेलियामध्ये येणं आम्हाला कायमच आवडतं. या देशात आम्ही खूप चांगलं क्रिकेट खेळलो. इथल्या प्रेक्षकांनी आम्हाला नेहमीच भरभरून प्रेम दिलं. त्यासाठी सगळ्यांचे आभार," असे म्हणत त्याने आपल्या भावनांना वाट करून दिली.