IND vs AUS 2nd ODI: अडलेडमध्ये खेळलेल्या दुसऱ्या वनडेमध्ये भारतीय संघाने झुंजार लढत दिली, पण शेवटच्या टप्प्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी उत्तम खेळ करत सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्मा (७३), श्रेयस अय्यर (६१) आणि अक्षर पटेल (४४) यांच्या खेळींच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला २६५ धावांचे आव्हान दिले. याचा पाठलाग करताना मॅथ्यू शॉर्ट (७४), कूपर कोनॉली (नाबाद ६१) आणि मिचेल ओवन (३६) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला. यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने २-०ची आघाडी घेतली.
भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० ओव्हरमध्ये ९ विकेट्स गमावून २६४ धावा केल्या. पहिल्या दोन विकेट्स फारच पटकन गेल्या. विराट कोहली पुन्हा शून्यावर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर जोडीने संघाला मोठी धावसंख्या गाठून देण्यात मदत केली. या दोघांच्या नंतर अक्षर पटेलने फटकेबाजी करत संघाची धावगती सुधारली. तर तळात हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग यांनी फलंदाजी करत संघाला अडीचशेपार नेले. ऑस्ट्रेलियाकडून झम्पाने ४, बार्टलेटने ३ तर स्टार्कने २ बळी घेतले.
ऑस्ट्रेलियाने २६५ धावांचे आव्हान अवघ्या ४६.२ षटकांतच पूर्ण केले आणि २ विकेट्सने सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाची सुरुवातही संथ झाली होती. मार्श आणि हेड स्वस्तात बाद झाले होते. पण मॅथ्यू शॉर्ट आणि कूपर कोनॉली या दोघांनी संघाला स्थैर्य दिले. दोघांनीही शांत आणि संयमी फलंदाजी करत खेळपट्टीवर जम बसवला. नंतर त्यांनी फटकेबाजीला सुरूवात केली. शॉर्ट बाद झाल्यानंतर कोनॉलीला मिचेल ओवनची साथ मिळाली. ओवन तडाखेबंद फटकेबाजी करत संघाला विजयासमीप आणले. अखेर कूपर कोनॉलीने नाबाद राहत संघाला विजय मिळवून दिला. भारताकडून सुंदर, अर्शदीप आणि हर्षित तिघांनीही २-२ बळी मिळवले.