IND-NZ: वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज तिलक वर्मा दुखापतीमुळे भारत-न्यूझीलंड मालिकेतील पहिल्या तीन टी20 सामन्यांत खेळू शकणार नाहीत. वर्ल्ड कपला अवघा एक महिना उरलेला असताना मिडल ऑर्डरमधील महत्त्वाचा फलंदाज संघाबाहेर जाणे ही टीम इंडियासाठी चिंतेची बाब मानली जात आहे.
रुग्णालयातून डिस्चार्ज, पण...
बीसीसीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, तिलक वर्माला गुरुवारी सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून, त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. तो लवकरच हैदराबादला परतणार आहेत. मात्र, जखम पूर्णपणे बरी झाल्यानंतरच तो सराव सुरू करू शकेल. त्यामुळेच, न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या तीन टी-20 सामन्यांत त्याला खेळता येणार नाही. चौथा आणि पाचवा सामना खेळण्याबाबतचा निर्णय त्याच्या रिकव्हरी आणि प्रशिक्षणातील प्रगतीवर अवलंबून असेल.
तिलक वर्माला नेमकं काय झालंय?
विजय हजारे ट्रॉफीत हैदराबाद संघाकडून खेळणाऱ्या 23 वर्षीय तिलक वर्माला अचानक तीव्र पोटदुखी सुरू झाली. त्याला तातडीने गोकुल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीत टेस्टिक्युलर टॉर्शन असल्याचे निदान झाले, ज्यामुळे तात्काळ शस्त्रक्रिया करावी लागली.
डॉक्टरांच्या माहितीनुसार शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून तिलक आता धोक्याबाहेर आहेत.
एशिया कप 2025 फायनलचा हिरो
तिलक वर्मा गेल्या वर्षभरापासून भारताच्या टी20 संघाचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. एशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात त्याने पाकिस्तानविरुद्ध नाबाद 69 धावांची खेळी करत भारताला विजेतेपद मिळवून दिले होते. त्यामुळे वर्ल्ड कपपूर्वी त्याची दुखापत भारतीय संघासाठी मोठा धक्का मानली जात आहे.
श्रेयस अय्यर पूर्णपणे तंदुरुस्त
दरम्यान, भारताचा वनडे उपकर्णधार श्रेयस अय्यर याला बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्स (COE) च्या वैद्यकीय पथकाने पूर्णपणे फिट घोषित केले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान झेल पकडताना त्याच्या प्लीहेस (spleen) दुखापत झाली होती, मात्र आता तो पूर्णपणे तंदुरुस्त आहे. विजय हजारे ट्रॉफीतही त्याने चांगली कामगिरी केली आहे.
भारत vs न्यूझीलंड मालिका वेळापत्रक
वनडे सामने
11 जानेवारी: पहिला वनडे – वडोदरा
14 जानेवारी: दुसरा वनडे – राजकोट
18 जानेवारी: तिसरा वनडे – इंदूर
टी20 सामने
21 जानेवारी: पहिला टी20 – नागपूर
23 जानेवारी: दुसरा टी20 – रायपूर
25 जानेवारी: तिसरा टी20 – गुवाहाटी
28 जानेवारी: चौथा टी20 – विशाखापट्टणम
31 जानेवारी: पाचवा टी20 – तिरुवनंतपुरम
न्यूझीलंडविरुद्ध भारताची 15 सदस्यीय टी20 संघरचना
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, वॉशिंगटन सुंदर, अर्शदीप सिंग, रिंकू सिंग, हर्षित राणा आणि ईशान किशन (यष्टीरक्षक).