Join us  

WPL 2023: "...म्हणून बॅटवर 'MSD 07' लिहून उतरले मैदानात", सोलापूरच्या लेकीनं केला खुलासा

Kiran Navgire: महिला प्रीमिअर लीगमध्ये सोलापूरच्या लेकीनं स्पॉन्सर मिळाला नाही म्हणून बॅटवर धोनीचे नाव लिहून मैदान गाजवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 5:13 PM

Open in App

kiran navgire bat । मुंबई : सध्या मुंबईत महिला प्रीमिअर लीगचा थरार रंगला आहे. महिला प्रीमिअर लीगच्या पहिल्या हंगामात एकूण पाच संघ रिंगणात आहेत. मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, यूपी वॉरियर्स, गुजरात जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील कोणता संघ बाजी मारणार हे 26 मार्चला स्पष्ट होईल. अशातच यूपी वॉरियर्सच्या संघाची फलंदाज किरण नवगिरे तिच्या बॅटमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली होती. मूळची सोलापूरची असलेल्या किरणने तिच्या बॅटच्या मागे 'MSD 07' असे लिहले आहे. आता असे करण्यामागे काय हेतू होता याचा तिने खुलासा केला आहे. 

यूपी वॉरियर्सने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये किरण नवगिरेने खुलासा करताना म्हटले, "मला स्पॉन्सर मिळण्यात उशीर झाला. म्हणून मी महिला प्रीमिअर लीगसाठी माझ्या काही जुन्या बॅट घेतल्या. जेव्हा मी पुण्यात घरात सराव करते, जेव्हा मी लाईव्ह सामना किंवा हायलाइट पाहते, तेव्हा सरावानंतर आम्ही एकत्र बसतो आणि बॅटबद्दल चर्चा करतो. WPL साठी येण्यापूर्वी मी सराव सत्रानंतर माझ्या सहकाऱ्यांसोबत बसले असता, आम्ही एमएस धोनी सरांबद्दल चर्चा करत होतो."

किरण नवगिरेने केला खुलासा "मी धोनी सरांबद्दल चर्चा करत होती आणि सहजच मी माझ्या बॅटवर 'MSD 07' असे लिहले. मी हे यासाठी लिहले कारण जेव्हा मी त्यांच्याबद्दल बोलते किंवा चर्चा करते तेव्हा कुठेही त्याचं नाव लिहिते", असे किरण नवगिरेने अधिक सांगितले. 

नवगिरेने महिला प्रीमिअर लीग 2023 मध्ये गुजरात जायंट्सविरुद्धच्या सामन्यात शानदार खेळी केली. तिने 43 चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 53 धावांची शानदार अर्धशतकी खेळी खेळली. यानंतर खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांमध्ये ती फार काही करू शकली नाही. तिला मुंबईविरुद्ध केवळ 17 धावा आणि दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 2 धावा करता आल्या. यूपी वॉरियर्सच्या फ्रँचायझीने किरणला WPL 2023 च्या लिलावात 30 लाखांमध्ये खरेदी केले होते. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :महिला प्रीमिअर लीगसोलापूरमहिला टी-२० क्रिकेटमहेंद्रसिंग धोनीप्रेरणादायक गोष्टी
Open in App